सोलापूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रा.पं.सालसे (ता.करमाळा) येथे ग्रामपंचायत तपासणी दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाचा एक अत्यंत संवेदनशील व भावनिक क्षण अनुभवास आला.या गावातील उभा राहू न शकणाऱ्या एका दिव्यांग बांधवाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता त्या दिव्यांग बांधवासोबत खाली बसून त्यांनी धनादेशाचे आपुलकी व सन्मानाने वितरण केले.
सालसे गावातील यावेळचा तो क्षण केवळ धनादेश देण्याचा नव्हता तर तो दिव्यांग बांधवांना एक विश्वास देण्याचा, व आत्मसन्मान जागवण्याचा होता शिवाय जिल्हा परिषदेचे प्रशासन हे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभे आहे याची जाणीव करून देण्याचा होता.यावेळी धनादेश मिळताच दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे अश्रू आणि समाधानाचे भाव उपस्थितांच्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणणारे होते. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून आम्हाला मिळालेली ही मदत आमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी वापरणार आहोत तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये आम्हीही सक्रियपणे सहभागी होऊ असा आशावादही यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, गट विकास अधिकारी डॉ.अमित कदम,सी.आर.सी.उमेश येळवणे, सरपंच सतिश ओहोळ, माजी उपसरपंच सुदामती घाडगे, दशरथ घाडगे, ग्रामपंचायत अधिकारी अनिल कब्जेकर, सदस्य मधुकर हांडे, गाजराबाई काळे, अशोक सालगुडे, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल राशनकर, मुख्याध्यापक हेळगर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पाणंद रस्त्यासाठी ग्रामस्थांनी एक लाख रूपयाची लोकवर्गणी गोळा करण्यात आली.सदर लोकवर्गणीचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.सालसे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के निधीमधून गावातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे नगरमध्ये पाणी पुरवठा व्यवस्था केल्यामुळे सुमारे २५० इतक्या ग्रामस्थांना पाणी पुरवठा व्यवस्थितपणे होणार आहे.महिला व बालकल्याण विभागाच्या दहा टक्केमधून एका महिलेस शिलाई मशिन तसेच दिव्यांग निधीमधून दिव्यांगांना प्रिंटर व किराणा दुकानामधील वजन काटेचे वितरण करण्यात आले.

More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले