सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयासमोर प्रचंड गदारोळ झाला. भाजप तर्फे एबी फॉर्म देण्यास विलंब झाल्याबद्दल काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाने हरकत घेतली. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व आमदार सचिन कल्याणशेट्टी हे उमेदवारांचे एबी फॉर्म देण्यासाठी आले असताना निवडणूक कार्यालयात प्रचंड गदारोळ पहावयास मिळाला.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत हा अर्ज निवडणूक कार्यालयात भरण्यासाठी उमेदवारांनी नॉर्थकोट येतील निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार हे गृहीत धरून पोलिसांनी चौकातूनच वाहने अडवून ठेवले होते त्यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांना चालतच कार्यालयात यावे लागत होते. याशिवाय उमेदवाराबरोबर ठराविक लोकांनाच कार्यालयात सोडले जात होते. तरीपण उमेदवार व समर्थकांनी गर्दी केल्यामुळे महापालिका परिसरात मंगळवारी प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. पोलिसांनी उमेदवारांना मिरवणुकीला परवानगी न दिल्यामुळे सर्वजण साधेपणाने अर्ज भरण्यासाठी येत होते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आदि प्रमुख पक्षाने उमेदवारांना थेट एबी फॉर्म न दिल्यामुळे कोण कोणत्या पक्षाकडून उभारणार हे उशिरापर्यंत स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही म्हणून पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्यांची धाकधूक वाढली होती. ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्यांची तर मोठी पंचायत दिसून येत होती. त्यामुळे गोंधळात भर पडली होती. सोमवार पर्यंत जवळपास 400 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी विक्रमी अर्ज दाखल झाले उशिरापर्यंत अर्जांची संख्या कळाली नाही.
भाजपच्या एबी फॉर्मला काँग्रेसची हरकत
काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व उमेदवारांचे A.B. फॉर्म दुपारी तीनच्या आत दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु दुपारी २:४५ भाजपचे नेते व शहर अध्यक्ष यांचे मुख्य निवडणूक कार्यालयात एबी फॉर्म घेऊन आगमन झाले. परंतु एकूण ७ निवडणूक कार्यालयामध्ये हे फॉर्म दाखल करण्यास त्यांना वेळ झाला. दुपारी ३:०५ मिनिटांनी एबी फॉर्म दाखल करत असताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सेनेचे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र हरकत घेण्यात आली. या विषयाचे लेखी निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने सरचिटणीस अँड केशव इंगळे व काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, युवक काँग्रेसचे रुपेश इंगळे यांनी सादर केले.

More Stories
आज दारातील पौर्णिमा… तुम्हाला महत्व माहित आहे का?
सोलापूर मनपा भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान