सोलापूरनिवडणूकमहापालिकाराजकीय

सोलापुरात मनपा निवडणुकीच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्याचा खून

सोलापूर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे (रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) यांची शुक्रवारी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबातील महिला या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार होत्या. मात्र पक्षाकडून ऐनवेळी उमेदवारी बदलण्यात आल्याने दोन दिवसांपासून दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता. अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला आणि त्यात बाळासाहेब सरवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ ‘क’ मध्ये भाजपच्या दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला होता. या प्रभागातून शालन शिंदे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपचे शंकर शिंदे यांच्याकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच कारणावरून शिंदे आणि सरवदे गटात वाद चिघळला. त्यात हाणामारी झाली.

15 जणांविरुद्ध गुन्हा पाच जणांना अटक 

या प्रकरणात भाजपचे उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रभाग क्रमांक 2 क मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून भाजपमधील दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. भाजपकडून शालन शंकर शिंदे यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर, त्यांच्याविरोधात भाजपच्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.अर्ज मागे घेण्यासाठी शालन शिंदे यांच्या गटाकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र यानंतरही वाद शमला नाही. याच वादातून मध्यस्थीसाठी गेलेले मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली, त्यानंतर इतर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

याप्रकरणी मयत बाळासाहेब सरवदे यांचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनअमर शंकर शिंदे
विशाल शंकर शिंदे,आदर्श शंकर शिंदे,सुनील शंकर शिंदे,राहुल राजू सरवदे,ईश्वर सिद्धेश्वर शिंदे,रोहित राजू सरवदे,तानाजी बाबू शिंदे,महेश शिवाजी भोसले,शंकर बाबू शिंदे,अनिल शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे, विशाल संजय दोरकर आदी आरोपींवर बीएनएस कलम 103, 109, 189 (1) 189 (2), 190, 191 (2), 191 (3), 49, 352, 351 (2) तसेच शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अंतर्गत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेबाबत लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्ठे करत आहेत. यात रात्री उशिरा पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button