सोलापूरमहाराष्ट्रराजकीय

अजितदादांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध; दुष्काळात पाणी दिले, उजनीचा तो निर्णय रद्द केला 

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले. सन 2012 मध्ये दुष्काळी स्थिती असताना उजनीतून पाणी सोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. पण अजितदादांनी उजनी धरण शून्यावर असतानाही भीमेतून सोलापूरकरांना पाणी दिले. दत्तामामा भरणे पालकमंत्री असताना इंदापूरसाठी उजनी पाण्याबाबत केलेला निर्णय अजितदादांनी सोलापूरकरांच्या विरोधामुळे रद्द केला. 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमाना अपघातात अजितदादांचे निधन झाले. महाराष्ट्र पोरका झाला. अजितदादांचे सोलापूरवर विशेष प्रेम होते. सोलापुरातील कार्यकर्ते शोक सागरात बुडाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. सोलापूरच्या प्रश्नासाठी ते नेहमी आग्रही भूमिका घेत. उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावरून अनेक वेळा वाद निर्माण झाले पण अजितदादांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यावर अजितदादांचा कार्यकर्त्यांचा सोलापुरात मोठा भरणा दिसून आला होता. जिल्ह्यात ग्रामीण भागात अजितदादांचे फॅन मोठ्या प्रमाणावर असल्याने राष्ट्रवादीची पकड मजबूत राहिली. अजितदादाच्या अकाली जाण्याने सोलापूरकरांनाही मोठा धक्का बसला आहे. या निमित्ताने अनेकांनी त्यांच्या भेटीच्या आठवणी ताज्या केल्या.

सन 2012 मध्ये राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. उजनीचे पाणी पातळी शून्यावर गेली होती. सोलापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. टाकळी योजना बंद पडल्यास सोलापूरकरांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार होते. सोलापूर महापालिकेत त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती.  सोलापूरकरांकडून पाण्याची मागणी होत होती. पण उजनी धरणातून पाणी सोडल्यास इंदापूर, बारामती भागातील शेती धोक्यात येईल म्हणून तेथील शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला होता. यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री होते. हिवाळी अधिवेशनात सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न गाजणार होता. अजितदादानी उजनी धरणातून पाणी सोडू नये, असा मोठा दबाव होता. याचवेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचा अभ्यास दौरा नागपूर अधिवेशनासाठी आला होता. श्रमिक पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष मनोज व्हटकर, सरचिटणीस राजकुमार सारोळे, ज्येष्ठ पत्रकार दिवंगत एजाजहुसेन मुजावर, सूर्यकांत आसबे यांच्या शिष्टमंडळाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते– पाटील यांच्या पुढाकारातून अजितदादांची भेट घेतली व सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न मांडला. अजितदादांनी कोणताही भेदभाव न करता तातडीने सोलापूरला पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दुष्काळातही सोलापूरकरांची तहान भागली.

उजनीचा तो निर्णय रद्द…

दत्तात्रय भरणे हे सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी उजनीतून दोन टीएमसी पाणी इंदापूरच्या वाट्याला दिल्याचा निर्णय पुढे रेटला होता. त्यांच्या भाषणातून हा मुद्दा पुढे आल्यावर सोलापुरातून याला प्रचंड विरोध झाला. त्यावर अजित दादांनी पुढाकार घेत हा निर्णय रद्द केला. आपल्या कृतीतून अजितदादा नेहमीच सोलापूरकरांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येते. अजितदादांनी नेहमीच सोलापूरवर प्रेम केले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते. आज हे कार्यकर्ते पोरके झाले आहेत.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कामानिमित्त एकदा अजितदादांना मुंबईत भेटायला गेलो होतो. तेव्हा दादांनी कामाचे स्वरूप ऐकून घेतल्यानंतर काम होईल गुरूजी,पण एवढ्या लांबून पावसाळ्यात कारने कशाला येत असता. पी.ए.नां कॉल करत जा किंवा मी बारामतीत असतो तेव्हा तिथे येत जा असे सांगितले. कार्यकर्त्यांची हक्काने काळजी घेणारा नेता काळाने हिरावून नेला याची खंत वाटते.

निलेश देशमुख,

शिक्षक सहकार संघटना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button