सोलापूरजिल्हा परिषद

चूक कोणाची… झेडपीच्या आषाढी वारीचे सर्व टेंडर झाले पण औषधाचे रखडले

सोलापूर : आषाढी वारी तोंडावर असतानाच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुन्हा तोंडावर पडला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या निविदा झाल्या पण आरोग्य विभागाच्या औषध खरेदीच्या निविदा रखडल्याचे जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत दिसून आले.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी करण्यात येणाऱ्या सुविधांच्या निविदेला मंजुरी देण्यासाठी प्रशासनातर्फे पंढरपूर येथे विशेष सभा घेण्यात आली. या सभेत सर्व विभागाने जाहीर केलेल्या निविदा मंजूर केल्याची आकडेवारी सभागृहापुढे मांडली. या निविदेला सभेत मंजुरी मिळाली. मागील सभेत आरोग्य विभागाने आयत्या वेळच्या विषयात आषाढी वारीच्या औषध खरेदीचा विषय आणला होता. पुन्हा या सभेत आरोग्य विभागाने सुमारे दहा कोटीच्या औषध खरेदीचा विषय सभागृहापुढे आणला. आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यासाठी औषध खरेदीची तरतूद मांडली. इतक्या मोठ्या प्रमाणावर औषध खरेदी असताना अजून निविदा का झाल्या नाहीत असा सवाल व्यंकट भालके यांनी उपस्थित केला. मोठ्या प्रमाणावर औषध खरेदी होणार असल्यामुळे एकाच कंपनीला टेंडर न देता सगळीकडे विभागून द्यावे. यातून झालेल्या औषध खरेदी सर्व आरोग्य केंद्रांना पुरविण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.

माळशिरस तालुक्यातील बऱ्याच आरोग्य केंद्रामध्ये औषधे नसल्याची तक्रार बागल यांनी केली. 44 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पालखी मार्गावरील हे आरोग्य केंद्र असल्याने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी केली. सीईओ कुशल जैन यांनी याची दखल घेतल्याचे सांगितले. सभापती केदार सावंत यांनी औषधे कमी पडणार नाहीत अशी व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले.

फार्मासिस्टमुळे झाला गोंधळ

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने अनुभवी फार्मसीस्ट नियुक्ती करण्याची तयारी केली होती. पण फार्मासिस्ट पुजारी यांनी विभागीय आयुक्तांकडून नियुक्ती आणली. मुख्य औषध भंडाराचा कारभार मोठा असल्यामुळे व पुजारी यांना अनुभव नसल्यामुळे आषाढी वारीच्या औषध खरेदीचा गोंधळ उडाला आहे. त्यांनी निविदेवर सीईओ व डी एच ओ यांच्या सह्या न घेताच अपलोड केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे औषध खरेदी रखडली. या गोंधळामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. पण प्रशासनाने चालढकल करून त्यांच्या कारभाराला पाठीशी घातल्याचे दिसून आले आहे. आरोग्य सभापती चेतन केदार यांनी हा गोंधळ थांबविण्याबाबत यापूर्वी सूचना केल्या आहेत. अनुभवी फार्मशिष्ट नेमावा असे सांगूनही डीएचओनी तसा प्रस्ताव दिला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत औषध खरेदीवरून गोंधळ दिसून आला. इतर विभागांनी मात्र आपल्या कामाच्या सर्व निविदा सभागृहाकडून मंजूर करून घेतल्या.

सभेत गोंधळ झाल्यावर शुक्रवारी सुट्टीचा दिवस असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी कोपूरवाड यांनी कार्यालयात हजेरी लावली. झेडपीच्या सभेला बांधकाम, महावितरण व महामार्ग विभागाचे अधिकारी हजर नसल्याबाबत ओरड झाली. तर इकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख हे सभेला न येता कार्यालयात बसून कारभार करीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button