सोलापूरजिल्हा परिषदपंढरपूर आषाढी यात्रा

पंढरपूरची आरोग्याची वारी; सोलापूर झेडपीची नाही तयारी

सोलापूर: पंढरपुरात जुलैमध्ये होणाऱ्या आषाढीच्या वारीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांनी तयारी सुरू केली असली तरी आरोग्याची वारी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग मात्र अद्याप सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आषाढीच्या वारीची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेएन स्वतः सर्व यंत्रणाच्या तयारीची माहिती घेत आहेत. गतवर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आषाढी वारीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून केले जाणाऱ्या कामाचे नियोजन केले होते. त्यात प्रत्येक विभागाची जबाबदारी ठरलेली आहे. जिल्हा आरोग्य विभागाचाही मोठा रोल आहे. गेले तीन वर्ष सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या वारी वेळेस महाआरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. दोन्ही पालखी मार्ग व वारी काळात पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग मोठी सुविधा पुरवीत असते. यात सोलापूर जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभागाचे मोठे यंत्रणा कार्यरत असते. जिल्हा आरोग्य विभाग जिल्ह्यातील सर्व यंत्रणाच्या मदतीने महाआरोग्य शिबिर यशस्वी करताना दिसून येत आहे. यासाठी आरोग्य विभागातर्फे मोठी तयारी केली जाते.

सध्या आषाढी वारीच्या तयारीची सर्वच विभागाकडून लगबग सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनीही पालखी मार्गाची पाहणी करून यंत्रणेचा आढावा घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जैन व जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपूरवाड हे नवीन आहेत. या दोघांना यंत्रणेचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी आरोग्य अधिकाऱ्याला आल्या आल्याच आयुष्यमान कार्डाच्या कामाला लावले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून आषाढीच्या तयारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रार आहे.

नवखा फार्मासिस्ट; अडचणी वाढल्या…

आरोग्याची वारी यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे औषधाचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे. यासाठी आधी दोन महिने तयारी करावी लागते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे मुख्य औषध भांडार सिविल हॉस्पिटलच्या आवारात आहे. येथील मुख्य औषध निर्माता प्रवीण सोळंकी निवृत्त झाल्यानंतर थेट विभागीय आयुक्तांकडून पुजारी यांनी येथे नियुक्ती आणली आहे. त्यांची वळसंगहून नगरल बदली झालेली असताना पाच महिन्यातच ही प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा औषधालयाचा अनुभव कमी असल्यामुळे आरोग्याच्या वारीच्या तयारीचा गोंधळ उडू शकतो. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची समन्वय साधून नवीन औषध खरेदीचे टेंडर काढणे गरजेचे असतानाही अद्याप हा विभाग शांतच असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर कोपरवाड यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर आषाढी यात्रेच्या तयारीबाबत माहिती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषदेत नव्याने पदाधिकारी आले आहेत. अद्याप त्यांना कोणत्या विभागाचे काम कसे चालते हे माहीत नाही. प्रतिनियुक्ती वरील कर्मचाऱ्यांनी आपली सोय मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनालाच कामाला लावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे यंत्रणेचा आढावा घेणे क्रम प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेत पदाधिकारी येऊन दोन महिने झाले तरीही कामकाजात फार काही मोठा बदल झाला असे दिसून येत नाही. जैसे थी परिस्थिती आहे. आज जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आहे. त्यामध्ये हा विषय गांभीर्याने घेतला जाईल असे एका सदस्याने “सोलापूर समाचार’ शी बोलताना सांगितले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमुळे प्रशासन यंत्रणेत काय चमत्कार घडतो हे आता पाहणे गरजेचे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button