सोलापूरमहाराष्ट्र

अंकुश चव्हाण यांना लष्कराकडून ‘दक्षिणी कमान सरसेनापती पदक’

सोलापूर : भारतीय सशस्त्र दलांसोबत कार्य करताना दाखवलेल्या उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठा, निःस्वार्थ समर्पण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल पुणे येथील संरक्षण जनसंपर्क अधिकारी भारतीय माहिती सेवेतील अधिकारी अंकुश चव्हाण यांना प्रतिष्ठित दक्षिणी कमान चा लष्कर प्रमुख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

हा सन्मान दक्षिण कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सन १९८४ नंतर हा मानाचा सन्मान प्राप्त करणारे चव्हाण हे पुणे येथील पहिले नागरी संरक्षण जनसंपर्क अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या कार्यातील निष्ठा, समर्पण आणि उत्कृष्टतेची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

या सन्मानामुळे नागरी अधिकाऱ्यांच्या योगदानाची दखल घेतली जात असून, भारतीय सशस्त्र दलांसोबत प्रभावी समन्वय साधण्यात चव्हाण यांनी बजावलेली भूमिका अधोरेखित झाली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचे ते विद्यार्थी आहेत. ते मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथील असून ग्रामीण भागातून येऊन उच्चपदस्थ ठिकाणी काम करीत असताना त्यांनी हा पुरस्कार पटाकावून सोलापूर जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे.

संरक्षण क्षेत्रातील जनसंपर्क, माध्यम समन्वय आणि संवेदनशील माहितीचे अचूक व जबाबदारीने व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.विशेष म्हणजे, नागरी अधिकाऱ्यांना क्वचितच मिळणारा हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो.त्यांचे कार्य केवळ व्यावसायिक उत्कृष्टतेचे नव्हे तर राष्ट्रसेवेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button