सोलापूरजिल्हा परिषदराजकीय

सोलापूर झेडपीच्या अध्यक्षपदी भाजपचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार बिनविरोध

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष निवड सभा झाली. सकाळी दहा ते बारा या वेळेत उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. जिल्हा परिषदेच्या 68 जागांपकी 38 जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे साहजिकच भाजपचेच पदाधिकारी निवडले जाणार हे गृहीत धरले जात होते. सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे सदस्य नेताजी खंडागळे, विकास बुळा यांच्यासह अर्ज घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आले. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे जाहीर केली. त्यानंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पक्षनेत्या रश्मी बागल या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकच उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाल्याचे जाहीर केले. दुपारी दोन वाजता विशेष सभेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अध्यक्ष पदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजीत पवार यांची निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा जिल्हाधिकारी आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सन्मान केला. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारी दाखल केली नाही. ते भाजप सोबतच काम करतील असे पालकमंत्री गोरे यांनी जाहीर केले. सर्व सदस्यांना निधी दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमुळे शेतकऱ्याचा मुलगा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला असे गोरे यांनी यावेळी सांगितले.  यावेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषदेतूनच आमदार घडावेत. त्यासाठी त्यांच्या तालुक्यातील विकास कामासाठी भरघोस निधी द्यावा असे मागणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पालकमंत्री गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच भाजपला मोठे यश मिळाल्याचे नमूद केले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत यांची भाषणे झाली. पालकमंत्री गोरे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान केल्यानंतर सभागृहात भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. 66 वर्षानंतर जिल्हा परिषदेत सत्तापालट झाल्याबद्दल पालकमंत्री गोरे यांनी समाधान व्यक्त केले. या जिल्ह्याचे मुख्यमंत्री होऊन गेले तरीही त्यांना त्यांच्या पक्षाला इतके यश मिळवून देता आले नाही. माझ्या कारकिर्दीत नगरपालिका, बाजार समिती, महापालिका, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वैद्य व पवार यांच्या कार्यकर्त्यांनी निवडीनंतर जिल्हा परिषदेत जल्लोष केला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या केबिनमध्ये जाऊन पदभार घेतला व चांगले कामकाज करण्याचे अभिवचन दिले. या निवडीनंतर जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे सुरू असलेल्या प्रशासक पदाचा कार्यकाल संपुष्टात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  निराळी यांनी विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी घोषित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button