सेवा संकल्प अभियानात डीएचओ सतीश कोपूरवाड यांची दमदार कामगिरी
एका दिवसात साडेआठशे वैद्यकीय बिलांना मंजुरी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी एका दिवसात साडेआठशे वैद्यकीय बिले मंजूर करून सेवा संकल्प अभियानात दमदार कामगिरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा कार्याचा सन्मान म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने राज्यात चांगली सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्राथमिक शिक्षण विभागात नव्याने भरती झालेल्या ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती देऊन मोहिमेला बळ दिले आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानात मोठे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता आरोग्य विभागाने मोठी जबाबदारी पार पाडली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग व इतर विभागाकडून आलेली वैद्यकीय बिले आरोग्य विभागात बऱ्याच दिवसापासून मंजुरीअभावी पडून होती. डॉ. कोपूरवाड यांनी या अभियानात एका दिवसात या बिलांचा निपटारा केला. यामुळे शिक्षण विभागातील वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांच्या फाईलवरही सही केल्यामुळे येत्या काही दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन डॉक्टर मिळणार असल्याचेही डॉ. कोपुरवाड यांनी सांगितले.



