
सोलापूर: कुर्डूवाडी येथील पत्रकार, मराठा सेवा संघाच्या तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष सतीश महिंगडे यांच्या आई विजया गोरख महिंगडे यांचे दि. १७ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. महिंगडे कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारानंतर त्यांची रक्षा नदीत विसर्जन न करता वृक्षारोपण करून जलप्रदूषण टाळण्याचा नवा पायंडा पाडला.
विजया यांच्या पश्चात पती गोरख महिंगडे, मुलगा सतीश महिंगडे, मुली सारिका सुरेश जाधव, शालन तानाजी क्षीरसागर, संगीता पांडुरंग राऊत, सून रूपाली महिंगडे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.आईच्या मृत्यूपश्चात महिंगडे कुटुंबियांच्या वतीने शनिवारी तिसऱ्या दिवशी शिवधर्माला अनुसरून वृक्षारोपण करून रक्षा विसर्जन करण्यात आले. नेहमीच्या परंपरेला फाटा देऊन राख व अस्थी नदीत न टाकता स्वतःच्या शेतात ७ खड्डे घेऊन त्यामध्ये रक्षा विसर्जन करून आईची स्मृती चिरकाल जपण्यासाठी सात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
नदीत रक्षा विसर्जन करून होणारे जलप्रदूषण महिंगडे कुटुंबियांनी टाळले व वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणार्थ हातभार लावला. याद्वारे महिंगडे परिवाराने मराठा सेवा संघाच्या विचारांना अनुसरून एक दिशादर्शक व परिवर्तनवादी पाऊल उचलले.
स्मृतीशेष विजया महिंगडे यांची स्मृती झाडांच्या माध्यमातून चिरकाल टिकावी व जलप्रदूषण होऊ नये यासाठी झाडे लावून त्या रोपांच्या मुळाशी रक्षा विसर्जन करण्यात आले. आईची आठवण या झाडांच्या सावलीत अनुभवता येईल, या भावनेतून या रोपांचे संगोपन महिंगडे कुटुंबीय आस्थेने करणार आहेत. यावेळी शिवाचार्य शंकरराव नागणे महाराज यांनी जिजाऊ वंदना व पसायदान घेऊन महिंगडे कुटुंबाने घेतलेल्या परिवर्तनवादी, दिशादर्शक निर्णयाची उपस्थितांना माहिती दिली.



