वकिलाने दिली नोटीस! सीईओ कुशल जैन म्हणाले, काय हे…
पुणे विभागात सोलापूर जिल्हा परिषदेने यात मारली बाजी

*सोलापूर :* सोलापूर जिल्हा परिषदेने पुणे विभागात बाजी मारत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली असताना, एका वकिलाने आक्षेप घेत नोटीस बजावल्याने चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी *कुशल जैन* म्हणाले, “त्या वकिलाच्या आक्षेपाच्या एक आठवडा आधीच आम्ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.”
सोलापूर जिल्हा परिषदेने नुकतीच नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. *दि. १७ सप्टेंबर रोजी* समुपदेशनाद्वारे शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आणि त्यानंतर *दि. २३ सप्टेंबर रोजी* शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली.
या आचारसंहितेमुळे सांगली, सातारा जिल्ह्याची शिक्षक भरती प्रक्रिया थांबली आहे. मात्र सोलापूर जिल्हा परिषदेने आधीच प्रक्रिया सुरू केल्यामुळे अडचण निर्माण झाली नाही. तरीही एका वकिलाने या प्रक्रियेवर आक्षेप घेत नोटीस बजावली आहे. तो आक्षेप खोडून काढत आचारसंहितेच्या आधीच प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्टीकरण सीईओ जैन यांनी दिले आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची शिक्षक भरती विना अडथळा पार पडल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी सीईओ जैन यांचे अभिनंदन केले आहे.
*स्थायी समितीसाठी परवानगी मागितली…*
राज्यात सर्वत्र शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने विकासकामे व नवीन उपक्रम थांबले आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेने *दि. १ ऑक्टोबर रोजी* स्थायी समितीची सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. सांगली, सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी अशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित सभेला परवानगी मिळेल की नाही, याबाबत शंका असून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



