
*सोलापूर दि. २९ सप्टेंबर :* सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार (DEIC) केंद्र, जिल्हा रुग्णालय सोलापूर यांच्या माध्यमातून जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आज १९ बालकांना हृदयरोग शस्त्रक्रियेकरिता बालाजी हॉस्पिटल, मुंबई येथे विशेष बसने पाठविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून बसला रवाना केले. यावेळी बोलताना सीईओ जैन म्हणाले की आज जागतिक हृदयदिन आहे. हृदयाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. पालक या नात्याने जिल्हा परिषद शाळेतील या बालकांच्या हृदयांची काळजी घेण्यासाठी मी तुमच्या स्वाधीन करीत आहे. डॉक्टरांना देव मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांनी या माझ्या बालकांच्या हृदयाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या मुलांच्या पालकांना १५ दिवस अगोदर पूर्वसूचना देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली होती. पालकांचे समुपदेशन करण्यात आले असून प्रत्येक बालकासोबत दोन पालकांना पाठविण्यात आले आहे. बससोबत एक वैद्यकीय पथकही पाठविण्यात आले आहे.
या शिबिरासाठी पालकांना व मुलांना जाणे-येणे, राहणे, जेवण-नाश्ता हा सर्व खर्च मोफत केला जाणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. इरफान सय्यद, डॉ. रोहन वायचळ, श्रीमती विजयमाला बेले, मेट्रन तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व RBSK व DEIC मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत *२००३ बालकांच्या हृदयरोग शस्त्रक्रिया व ११,८६० विविध आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत* करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश मुले गरीब व कष्टकरी कुटुंबातील आहेत. ज्या शस्त्रक्रियेसाठी १० हजार ते ८ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे, त्या मोफत करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सांगितले.



