सोनवणे यांनी स्वीकारला समाजकल्याणचापदभार; दिव्यांग विभाग सचिन जगताप यांच्याकडेच
दोन वर्षानंतर मिळाला समाजकल्याणला पूर्ण वेळ अधिकारी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या समाज कल्याण विभागाचा पदभार सागर सोनवणे यांनी अधिकृतरित्या स्वीकारला आहे . सोनवणे यांचा प्रशिक्षणार्थी काळ असल्याने दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार यापुढेही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी म्हणून सोनवणे यांची एक ऑगस्टला त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. दुसरीकडे दिव्यांग कल्याण विभागाची अतिरिक्त जबाबदारी असलेले माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी आपल्यावरील कामाचा ताण पाहता या विभागाचा पदभार सोडत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले एसआयआर सुनावणी, माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार आणि सध्या एसआयटीमार्फत सुरू असलेल्या चौकशा यामुळे कामाचा ताण असल्यामुळे या विभागाची अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करावे अशी त्यांनी विनंती केली होती. त्यामुळे या विभागाचा पदभार समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होते. पण मी प्रशिक्षणार्थी असल्याने या विभागाचा अतिरिक्त पदभार नको अशी विनंती सोनवणे यांनी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी जगताप यांनी दिलेले पत्र तसेच ठेवण्यात आल्या असून त्यांना या विभागाचे जबाबदारी पाहण्याचे सुचित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विभागातील त्यांच्या अनुभव आणि कामाची पद्धत पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.



