सोलापूरजिल्हाधिकारी कार्यालय

केंद्रीय पथकाने पाहिला कोरडा तलाव, जळालेले सोयाबीन

पानगाव साठवण तलावाची पाहणी, जिल्ह्यात सध्या 108 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सोलापूर : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष शेतपाहणी केली. पावसाअभावी जळालेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.

केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी करीत आहेत. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील पथकासोबत उपस्थित होते.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट
पानगाव येथे पथकाने पावसाअभावी जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकरी आनंद धनंजय मोरे यांच्याशी संवाद साधून पिकांची स्थिती, शेतीसाठी झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याबाबत माहिती घेतली. पाऊस चांगला झाला असता, तर सोयाबीनमधून हेक्टरी ५० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते; मात्र पावसाअभावी पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, जळालेले सोयाबीन जनावरेही खात नसल्याचे मोरे यांनी पथकाला सांगितले.

पथकाने पानगाव येथील साठवण तलावाचीही पाहणी केली. तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे निदर्शनास आले. बार्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता यावरून स्पष्ट होत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने पथकाला देण्यात आली.

पिकांचा खर्च, भूजल पातळी आणि चारा व्यवस्थेची माहिती
उपळाई ठोंगे येथे लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यांचे बंधू कल्याण चव्हाण यांनी पथकाला पीक नुकसानीची माहिती दिली. चार एकर क्षेत्रात पीक घेण्यासाठी प्रति एकर २० ते २५ हजार रुपये खर्च झाला असून, पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.

पथकाने पेरणीपासून झालेला पाऊस, पावसातील खंड, पिकांची वाढ, गावातील एकूण पेरणी क्षेत्र, सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धती तसेच भूजल पातळी याबाबत माहिती घेतली. जनावरांसाठी चारा उपलब्धतेची स्थिती जाणून घेत चारा डेपो सुरू करणे किंवा चारा छावण्या उभारणे यापैकी कोणता पर्याय अधिक उपयुक्त ठरेल, याबाबतही शेतकऱ्यांची मते विचारात घेतली. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करणार
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची व्याप्ती आणि पाणीटंचाईबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पीक नुकसानीचे आतापर्यंत ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तहसीलदार एफ. आर. शेख, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संतोष कोल्हे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 138 गावे असून भौगोलिक क्षेत्र 1,50,316 हेक्टर व पेरणी क्षेत्र 1,36,546 हेक्टर आहे, सरासरी खरीप 73,177 हेक्टरच्या तुलनेत यंदा 1,01,056 हेक्टरवर पेरणी झाली असून सोयाबीन, तूर, उडीद ही प्रमुख पिके व द्राक्षे, कागदी लिंबू ही प्रमुख फळपिके आहेत, मात्र सरासरी 528.10 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 291.34 मिमी म्हणजे 44.83% तूट व 21 ते 44 दिवसांचा कोरडा काळ यामुळे सर्व 138 गावे व 1,12,226 हेक्टर क्षेत्र दुष्काळबाधित झाले असून 73,424 हेक्टरवर (65.42%) दुष्काळ नुकसानीची स्पॉट पाहणी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर प्रशासनाने दिली

केंद्रीय पथक शनिवारी उत्तर सोलापूर, मंगळवेढा व सांगोला तालुक्यांतील दुष्काळी भागांची पाहणी करणार असून, प्रत्यक्ष निरीक्षणे आणि संबंधित विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button