सोलापूरजिल्हा परिषदपंढरपूर आषाढी यात्रा

पंढरीकडे निघालेला शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल

सोलापूर  : आषाढी वारी २०२६ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीने आज धाराशिव जिल्हा हद्दीतून तामलवाडीच्यापुढे उळे कासेगाव सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर झालेल्या या स्वागत सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे, सुमित शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे, पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे सभापती संदीप ढवळे, उपसभापती वर्षा पटणे तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे मानाच्या दहा पालख्यांसह शेकडो दिंड्या येत असतात. श्री संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातून निघून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सहभागी वारकरी ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ असा जयघोष करत, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भजन-कीर्तन करत आनंदाने पुढे मार्गस्थ होत आहेत. अबालवृद्ध वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरीच्या दिशेने चालण्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे.जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. शुक्रवारी श्री गजानन महाराजांची पालखी उळे येथे मुक्काम करून शनिवारी सोलापूर शहरात प्रवेश करेल. शेगावीचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्याबरोबर पावसानेही ठिकठिकाणी हजेरी लावल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button