सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीच्या अधिकाऱ्यांवर लोकेशनवरून वॉच

व्हिजिटच्या नावाखाली घरोबा करणाऱ्यांवर बसणार जरब

सोलापूर : कार्यालयीन कामासाठी व्हीजीट  दाखवून घरोबा करणाऱ्या झेडपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता चांगलीच जरब बसणार आहे.  मोबाईल लोकेशनवरून अधिकाऱ्यांचे ठिकाण निश्चित करून खातरजमा करण्यात येत असल्याने खोटे बोलणाऱ्यांची आता पाचावर धारण बसली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यापासून कार्यालयीन शिस्तीवर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेचा अंमल सुरू झाल्यावर प्रशासकीय नवीन कामकाज थांबले आहे. निवडणूक कामासाठी जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना ड्युटी लावण्यात आल्याने गेले काही दिवस जिल्हा परिषदेत शुकशुकाट जाणवत होता आता मतदान झाल्यानंतर बरेच कर्मचारी व अधिकारी आपल्या मूळ कामावर परतले आहेत. पण तरीही आरोग्य व माध्यमिक शिक्षण विभागात अजूनही शुकशुकाट जाणवत आहे. अनेक शिक्षक व नागरी कामानिमित्त या कार्यालयांकडे हेलपाटे मारताना दिसत आहेत. अधिकारी व्हिजिटला गेले आहेत, अशी कारणे सांगितली जात आहेत.

आरोग्य विभागाची गुरुवारची स्थिती 

जिल्हा परिषदेच्या इतिहासात असे बरेच किस्से घडले आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून गायब असतात. विचारणा केल्यावर ते व्हिजिटला गेले, कोर्ट कामासाठी मुंबईला आहेत असे सांगण्यात येते. सीईओ आव्हाळे यांनी अशा गोष्टीला पायबंद घालण्यासाठी यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. दररोज विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी कोठे आहेत? याची माहिती घेतली जात आहे. त्यांनी दिलेले उत्तर व त्यांचे मोबाईल लोकेशन तपासून खातरजमा केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बाता मारणाऱ्यांची आता खैर नाही अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.

माध्यमिक शिक्षण विभाग 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button