सोलापूरक्राईम

शाळकरी मुलाचा पाय तोडला, मंद्रूप पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष

मुलीच्या आईने पोलीस अधीक्षकांकडे मागितली दाद

सोलापूर : सायकलवर शाळेला जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून एका 14 वर्षीय शाळकरी मुलास काठी व रॉडने बेदम मारहाण करून पाय मोडल्याची घटना मंद्रूप शिवारात घडली आहे. याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी दखल  घेतली नसल्याबाबत जखमी मुलाच्या आईने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

ओगसिद्ध पुजारी (वय 14) असे मारहाणीत जखमी झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. जखमी ओगसिद्ध हा गेल्या शनिवारी पहाटे साडेपाच वाजता सायकलवरून शाळेकडे निघाला होता. वाटेत परमेश्वर बगले हा रस्त्यावर व्यायाम करत होता. त्याला ओगसिद्ध याच्या सायकलचा धक्का लागला. या कारणावरून परमेश्वर बगले, त्याची आई रेखा, परसु बगले व इतर दोन जणांनी काठी व रॉडने त्याला बेदम मारहाण केली. यात जखमी होऊन तो बेशुद्ध पडला ही माहिती मिळताच त्याची आई संगीता पुजारी हिने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले या मारहाणीत ओगसिद्धचा याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. याबाबत संबंधिताविरुद्ध तक्रार देण्यासाठी त्याची आई संगीता पुजारी हिने मंद्रूप पोलीस ठाणे गाठले. पण ठाणे अंमलदाराने दाद घेतली नाही.  त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हुल्ले यांची भेट घेऊन कैफियत मांडल्यावर त्यांनीही ही तक्रार बेदखल केल्याचा आरोप पुजारी यांनी केला आहे.  मंद्रूप पोलिसांच्या बेफिकिरीबाबत अखेर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं व कैफियत मांडली आहे. आता पोलीस अधीक्षक कार्यालयाने त्यांना पुन्हा मंद्रूप पोलीस ठाण्याकडे जाण्यास सांगितले आहे. मंद्रूप पोलिसांनी जर न्याय न दिल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शाळकरी मुलाला इतक्या निर्दयतेने बेदम मारहाण होते व त्याची दखल मंद्रूप पोलीस घेत नसल्याबद्दल पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुलींना विनाकारण पोलीस ठाण्यात नेल्याबद्दल दोन महिला शिपायांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी निलंबित केल्याचे प्रकरण ताजेच आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे या प्रकरणाकडे कोणत्या भूमिकेतून पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button