सोलापूर : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळत आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर मध्य, सोलापूर उत्तर, माळशिरस आणि पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सहाही उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत. अशाप्रकारे सोलापूर जिल्ह्यात भाजप षटकार मारत असून काँग्रेस हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण सोलापूरमधून आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूर मधून विजयकुमार देशमुख हे दोघेही 25000 मताधिक्याने आघाडीवर आहेत. सुभाष देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अमर पाटील तर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी टक्कर दिली. पण दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या भूमिकेने गोंधळ उडाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मतदानादिवशी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले मात्र त्याचा फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचाही फारसा परिणाम दिसून आला नाही. उत्तर सोलापूरमध्येही विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे महेश कोठे यांनी टक्कर दिली. पण येथील जनतेने विजयकुमार देशमुख यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कौल दिल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहर मध्य मध्ये खासदार प्रणिती शिंदे यांचा वारसदार कोण ठरणार हा विषय चर्चेचा ठरला होता. या मतदारसंघात काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली होती. पण आता मतदारांचा कौल पाहता भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे व एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दि यांच्यात काटे की टक्कर झाल्याचे दिसून आले. या मतदारसंघात देवेंद्र कोठे आघाडीवर आहेत. अक्कलकोटमध्ये विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात आमने-सामने सामना झाला. पण अक्कलकोटमधील जनतेने विकासाच्या बाजूने म्हणजे कल्याणशेट्टी यांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून येत आहे. मोठ्या मताधिक्याने ते निवडून येणार असे चित्र आहे.
माळशिरसमधील निकाल मात्र धक्कादायक आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक लढवलेले राम सातपुते यांना या मतदारसंघात पुन्हा यश मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी जोरदार प्रचार केला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेला पुन्हा भाजपने त्यांना याच मतदारसंघात उमेदवारी दिली. लोकसभेचे वातावरण पाहता त्यांना या मतदारसंघात यश मिळणे कठीणच असल्याचे बोलले जात होते. मोहिते पाटील यांचे वर्चस्व पाहता यावेळेस त्यांची खैर नाही अशी चर्चा होती. पण मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. थोड्याफार फरकाने ते विजयाच्या दिशेने घोडदौड करीत आहेत. त्यामुळे ते विजयी झाले तर हा निकाल धक्कादायक म्हणावा लागेल. मंगळवेढा पंढरपूर मतदार संघात भाजपचे समाधान आवताडे यांना चुरशीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा निकाल काय होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दुपारच्या नव्या फेरी अखेर भाजपचे सर्व उमेदवार विजयाचे दिशेने आगेकूच करीत असल्याचे दिसून आले. काँग्रेसचे एकमेव उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे हे पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजप षटकार मारणार आणि काँग्रेस हद्दपार होणार असे चित्र सध्याच्या मतमोजणीवरून दिसत आहे. मोहोळ मतदार संघात महाविकास आघाडीचे राजू खरे, करमाळा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नारायण पाटील, बार्शी मतदारसंघात शिंदे सेनेचे राजेंद्र राऊत आणि सांगोला मतदार संघात शेकापचे देशमुख हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. माढा मतदारसंघात अपक्ष रणजितसिंह शिंदे व महाविकास आघाडीचे अभिजीत पाटील यांच्यात काटे की टक्कर सुरू आहे. मोहोळ मध्ये महाविकास आघाडीचे राजू खरे आघाडीवर आहेत. मोहोळ मतदार संघात माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्वाला शह देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या 39 गावांनी खरे यांना ताररल्याचे दिसून येत आहे. मतदारांचा कौल पाहता विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, संजयमामा शिंदे, यशवंत माने हे पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहेत. अंतिम निकालानंतर यातील चित्र स्पष्ट होणार आहे.
बार्शीत राऊत यांना धक्का
बार्शी मतदारसंघात शिंदे सेनेचे राजेंद्र राऊत हे सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. माजी मंत्री दिलीप सोपल हे त्यांचा लीड तोडून पुन्हा आघाडीवर आले आहेत. त्यामुळे मतदारसंघात विद्यमान आमदार राऊत यांना धक्का बसणार असे चित्र दिसत आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ