सोलापूरजिल्हा परिषद

होय, गायरानावर अडकली गरिबांची घरकुले!

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गरिबांसाठी मंजूर झालेली घरकुले केवळ गायरान जमिनीच्या अडचणीमुळे रखडली आहेत. घरकुल मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला असून केवळ दुसरा हप्ता मिळत नसल्यामुळे त्यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. या लाभार्थ्यांना वाळूचाही लाभ देण्यात आला नाही.

काय आहे प्रकरण?

केंद्र व राज्य सरकारच्या *पंतप्रधान आवास योजना व शबरी / रमाई आवास योजनेअंतर्गत शेकडो लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नसल्याने त्यांनी गायरान जमिनीवर घरे बांधली आहेत.महसूल विभागाच्या नियमानुसार गायरान जमीन ही अतिक्रमण समजली जात असल्याने त्यांना घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळत नाहीये. हातात मंजुरी पत्र असूनही अनेक कुटुंबे आजही पत्र्याच्या व कच्च्या घरात राहत आहेत.

लाभार्थ्यांची व्यथा

आम्हाला घरकुल मंजूर होऊन दोन वर्षे झाली, पण जागेचा दाखला नाही म्हणून हप्ता मिळत नाही. त्यामुळे घराचे पुढील बांधकाम थांबले आहे असे मंद्रूप येथील इंदिरानगर येथील लाभार्थी अरविंद साठे यांनी सांगितले.

प्रशासन काय म्हणते?

गायरान जमीन नियमित करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव व तहसीलदारांची परवानगी आवश्यक आहे. जोपर्यंत जमीन नियमित होत नाही, तोपर्यंत निधी वितरित करता येत नाही, अशी माहिती दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.

पावसाळा असून झाली अडचण…

गरिबांची अडकलेली घरकुले तात्काळ मार्गी लावून गायरान जमीन नियमित करावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. घरकुल मध्ये नाव आले व पहिला हप्ता मिळाला म्हणून अनेकांनी आपली घरे पाडून बांधकामे सुरू केले आहेत. सध्या पावसाळा असूनही दुसरा हप्ता न मिळाल्याने अनेक जण विनाछत राहत आहेत. एकीकडे अधिकारी घरकुलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी व बांधकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बैठकांवर बैठका घेताना दिसत आहेत पण गायरान जमिनीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे अडचणी वाढले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठका घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button