सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या रिव्हाल्वरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. मोदी येथे त्यांचे मोठे न्यूरो हॉस्पिटल आहे. डोक्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ते मरण पावल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून माहिती घेण्यात येत आहे. नेमकी ही घटना कशी घडली? डोक्याला गोळी कशी लागली? याचा पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस उप आयुक्त विजय कबाडे यांच्याकडून माहिती घेतली असता शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास राहत्या घरात बाथरूममध्ये स्वतःच्या रिवाल्वरमधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांना गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी रामवाडी येथील त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून प्रकृती अतिशय गंभीर होती.त्यांनी डोक्यात दोन गोळ्या झाडल्या आहेत. यापैकी एक गोळी डोक्यातून आरपार गेली आहे. पहिली गोळी डोक्यातून आरपार गेल्यावर तोल गेल्याने दुसरी गोळी वरील काचेला लागून काचही फुटली आहे. कुटुंबीयांनी त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपस्थित डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. रात्री पावणे अकरा वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
असा घडला घटनाक्रम…
डॉ. वळसंगकर यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांची तपासणी केली व त्यांच्याशी नेहमीप्रमाणे संवाद साधला. सात वाजता ते घरी परतले. बेडरूममध्ये पत्नी उमा व सासरहून आलेल्या मुलीबरोबर ते गप्पा मारत बसले होते. साडेआठच्या सुमारास ते बाथरूम मध्ये गेले आणि स्वतःच्या खिशातील रिवाल्वर काढून डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या. आवाजाने पत्नी व मुलीने तेथे धाव घेतली.ते रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये पडले होते. उपस्थितानी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस ही तेथे हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळी सांडलेले रक्ताचे नमुने घेतले व रिवाल्वर, पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
त्यांचा अल्प परिचय…
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले. विज्ञानाची पूर्व-पदवी उत्तीर्ण झाले आणि प्री-प्रोफेशनलही उत्तीर्ण झाले. वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकत होते .
भारतात प्रशिक्षण
१. अनिवार्य रोटरी इंटर्नशिप इंटर्न, सीपीआर हॉस्पिटल-कोल्हापूर (०१/०७/७८ ते ३१/१२/७८)
२. इंटर्न, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्डुवाडी (०१/०१/७९ ते ३०/०६/७९)
३. जनरल हॉस्पिटल, सोलापूर येथे तीन वर्षांचे पदव्युत्तर प्रशिक्षण (डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज-सोलापूर) अंतिम एमडी
४. निवासी वरिष्ठ रजिस्ट्रार (न्यूरोलॉजी विभाग) बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (शिक्षण न देणारे परंतु न्यूरोलॉजीमधील विशेषज्ञ प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यूरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त (०७/०५/१९८३ ते २२/१२/१९८३).
५. लोकम कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट – बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (०८/०५/१९८३ ते २३/०५/१९८३ आणि १०/११/१९८३ ते २०/११/१९८३).
मोदी येथे त्यांचं स्वतःचं मोठं हॉस्पिटल आहे. मेंदूच्या गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या. पुणे, मुंबईतील मोठ्या हॉस्पिटलला भेटी देण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान घेतले होते. विमान ते स्वतः चालवायचे. अशा प्रसिद्ध मेंदूच्या डॉक्टरांने डोक्यात गोळी मारून आत्महत्या करावी ही घटना सोलापूरकरांना धक्का देणारी ठरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, सून डॉ.शोनाली आणि मुलगा अश्विन व विवाहित मुलगी असा परिवार आहे. अलीकडे हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुनेकडे गेल्याचे सांगण्यात आले.
जग सफरीचे स्वप्न अधुरे
वर्ल्ड टूर विमानाने करायचे स्वप्न राहून गेले, खास वर्ल्ड टूरसाठी वळसंगकर यांनी अलीकडे डबल इंजिन डायमंड प्लेन खरेदी केले होते, आणि वर्ल्ड टूरची तयारी सुरु केली होती. पण त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. या घटनेनंतर सोलापुरातील अनेक डॉक्टरांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


More Stories
बा विठ्ठला… वारकऱ्यांच्या सेवेसाठी अंगी बळ दे; सीईओ कुशल जैन यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
माऊलीचा पालखी सोहळा जाणून घेण्यासाठी झेडपीचे नूतन सीईओ जैन फिल्डवर
मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हासाठी कशाला हट्ट करेन…