सोलापूर : पुढील आठ दिवसात विमा कंपनीने स्थळ पंचनामा प्रति, विमा वाटप याद्या, रिजेक्शन याद्या व छायाचित्रे द्यावेत अन्यथा पिक विमा कंपनीविरुद्ध (Oriental Insurance) गुन्हा दाखल करण्यातचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
खरीप हंगाम पूर्व नियोजनाची नुकतीच बैठक झाली. प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 पासून राज्यात व सोलापूर जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देण्यात येते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जोखमीच्या पाच बार्बीचा समावेश आहे. हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी अथवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पीक पेरणी पासून काढणी पर्यंत च्या कालावधीत पिकाच्या उत्पन्नात येणारी घट या जोखमीच्या बाबी सर्व समावेशक असून यासाठी कोणतीही पूर्व सूचना देण्याची आवश्यकता नाही. स्थानिक नैसर्गिक आपती मुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात नुकसान या जोखमीच्या बाबी करिता शेतकऱ्यांकडून पूर्व सूचना दिली जाते व वैयक्तिक स्तरावर विमा कंपनी प्रतिनिधी कडून पंचनामे करून नुकसान ठरवले होते.
खरीप व रब्बी हंगाम 2023 मध्ये वर्षभरात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून एकूण 152775 पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीकडे देण्यात आल्या त्यापैकी विविध कारणांमुळे 120710 पूर्वसूचना नाकारून कंपनीने शेतकऱ्याऱ्यांना विमा नामंजूर केला. यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभाग व महसूल विभागाकडे तक्रार केली. मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 ऑगस्ट 2024 व 28 जानेवारी 2025 रोजी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये तक्रारींची दखल घेऊन सदरील पीक नुकसानीच्या पूर्वसूचना स्वीकृत करून शेतकऱ्यांना पिक विमा देण्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीस आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने केलेल्या परिगणनेनुसार 63000 शेतकऱ्यांचे अंदाजित 75.50 कोटी रुपये असून याबाबत कंपनी राज्यस्तरावर अपीलात गेली आहे.
शेतकऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या पिक नुकसानीच्या पूर्व सूचना बाबत मा. जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनी वारंवार याबाबत आढावा घेवून, परिपत्रक काढून सीएससी केंद्र चालकांचे प्रशिक्षण, व्हाट्सअप ग्रुप द्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती, याम सुरक्षा यंत्राचा वापर, इत्यादी द्वारे पिक नुकसानीच्या पूर्व सूचना नाकारण्यात चे प्रमाण कमी करण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या. विमा कंपनीस वेळोवेळी दिलेल्या सूचना, आदेश परिपत्रके, प्रशिक्षणे यामुळे खरीप 2024 मध्ये पीक नुकसानीच्या पूर्वसूचना नाकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. खरीप 2024 मध्ये शेतकऱ्यांकडून दिलेल्या 306000 पूर्वसूचनापैकी 227000 (74%) पूर्व सूचनांचा स्वीकार करून विमा कंपनी द्वारे 278.7 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.
खरीप 2024 मध्ये पीक नुकसानीचे पंचनामे व अहवाल तयार करण्यामध्ये अनियमितता असल्यामुळे विमा कंपनीकडे वारंवार स्थळ पंचनामा प्रत व छायाचित्रे याची मागणी वारंवार जिल्हास्तरीय आढावा बैठकीत करण्यात आलेली आहे परंतु अद्याप पर्यंत कंपनीकडून या बाबींची पूर्तता करण्यात आली नाही. दि. 16 मे रोजी झालेल्या खरीप हंगाम पूर्व बैठकीमध्ये पुढील आठ दिवसात विमा कंपनीने स्थळ पंचनामा प्रति, विमा वाटप याद्या, रिजेक्शन याद्या व छायाचित्रे द्यावेत अन्यथा पिक विमा कंपनीविरुद्ध (Oriental Insurance) गुन्हा दाखल करण्यातचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत,अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की