सोलापूरजिल्हा परिषद

अंगणवाडीची कार्यशाळा उधळली; सीईओ जंगम चौकशी करणार

सोलापूर : महाराष्ट्र शासनाचा सोलापूर जिल्हा परिषदेला सेवाकर्मी पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुरू असलेली अंगणवाडीची कार्यशाळा उधळून लावून सत्कार कार्यक्रम घेतल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदेचे गुणांकनावरून झालेल्या फेरीचे निकाल जाहीर केले. राज्यातील आठ जिल्हा परिषदेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे नाव अव्वल आले. त्याबद्दल जिल्हा परिषदेत त्यांचा सन्मान करण्यात आला. पण हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला. या कार्यक्रमाचे अधिकाऱ्यांना निमंत्रणच दिले गेले नव्हते. याबाबत “सोलापूर समाचार’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले. पुरस्कारासाठी सर्वांचे योगदान आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनाही या कार्यक्रमाला बोलवायला हवे होते, अशी प्रतिक्रिया अक्कलकोट पंचायत समितीमधील दयानंद परिचारक यांनी दिली. त्यानंतर अशाच प्रतिक्रिया इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांमधून उमटल्या.

या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी माहिती घेतल्यावर यावेळी सभागृहात महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ही कार्यशाळा सुरू असतानाच काहीजण सभागृहात आले व आता सीईओचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे कार्यशाळा आटोपती घ्या असे सांगून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सभागृहातून बाहेर काढले. या कार्यक्रमाला कोणाची परवानगी घेतली, अशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहीणकर यांनी चौकशी केली. यावेळी प्रशासन विभागातील अविनाश गोडसे यांनी त्यांच्याशी वाद घातला. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी नाराजी व्यक्त करीत सीईओकडे या घडामोडीचा अहवाल पाठविला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत बरेच वातावरण तापले आहे. सीईओ जंगम हे दोन दिवस दौऱ्यावर होते त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती. मंगळवारी त्यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.

सीईओना पुरस्कार मिळाला याबद्दल आम्हाला अभिमान आहे. यातून सोलापूर जिल्हा परिषदेची मान उंचावली आहे. हा आनंद सर्वांचा आहे. आम्हीही त्यांचा सन्मान केला आहे. सभागृहात जाहीर कार्यक्रम होत असताना सर्वांना कल्पना देणे आवश्यक आहे. पण चुकीच्या बाबी निदर्शनाला आल्याने चौकशी करून घडलेल्या प्रकाराबाबत सीईओंना अहवाल सादर केला आहे.

संदीप कोहिनकर 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 

 

मी दोन दिवस दौऱ्यावर होतो. कार्यक्रमावेळी काय घडले मला माहित नाही. मला अचानक बोलावल्यामुळे मी गेलो. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी याची भेट झाली नाही. याबाबत त्यांच्याशी चर्चा करतो.

कुलदीप जंगम 

मुख्य कार्यकारी अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button