सोलापूर : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पहिल्याच दिवशीच्या मुक्कामी 9 हजार 485 वारकऱ्यांची फूट मसाजरद्वारे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सेवा केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फूट मसाजरवर पाय चेपून घेणाऱ्या वारकऱ्याशी संवाद साधला असता, त्या वारकऱ्याने ‘माऊली” हे लय पुण्याचं काम केलं बघा..! अशी प्रतिक्रिया दिली. मंगळवारी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याही पालखीचे आगमन झाले आहे त्यामुळे फूट मसाजरची सेवा घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.
यंदाच्या पालखी सोहळ्यात पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फूट मसाजरची मोठ्या प्रमाणात सोय केली आहे. जिल्हा परिषदेचे 140 कर्मचाऱ्यांसमवेत 400 फूट मसाजर पालखी मार्गावर ठेवण्यात आले आहेत. माळशिरस तालुक्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल तोडकरी, अश्वजीत सरवदे, के. पी. शिंदे, विजय रणदिवे, दिलीप पोतलकर, स्वप्निल ढोबळे, आनंद कुलकर्णी, पांडुरंग सुरवसे, आनंद टेके, एन. एम. ननवरे, संग्राम पारसेवार, एस. एम. बारवे, एसपी गव्हाणे, जी.आर. भिडे, डी.डी. निंबाळकर, नितीन सुरवसे या टीम प्रमुखांनी कामकाज पाहिले. या सर्वांना सह नियंत्रण म्हणून अविनाश गोडसे व झहीर शेख यांनी कामकाज केले.
वारकऱ्यांची पडली गर्दी…
माऊलींचा पालखी सोहळा विसावल्यावर फूट मसाजर साठी वारकऱ्यांची केंद्रावर गर्दी पडली. पालखी सोहळ्या बरोबर चालून अनेक वारकऱ्यांचे पाय, गुडघे, पिंढऱ्या दुखत होत्या. या दुखऱ्या पायावर पुट मसाजरचा चांगला परिणाम दिसला. फूट मसाजर वर व्यायाम केल्यामुळे वारकऱ्यांना चांगलाच आराम मिळाला. दुखणे कमी होत असल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी फूट मसाजरसाठी केंद्रावर रांगा लावल्या. त्रास होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुटमसाजरचे सेवा मिळावी म्हणून अनेक भाविक पुढे येताना दिसून आले. माऊली, माऊली या आजोबांना सेवा द्या, असा पुढाकार घेत अनेकजण ज्येष्ठ नागरिकांचे दुखणे हलके करताना दिसून आले. दमलेल्या वारकऱ्यांची सेवा करताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान तरंगले. आषाढी वारीत विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेने कर्मचारी धन्य झाले. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत ही सेवा चालली. मंगळवारी पालखी सोहळ्याचा मुक्काम संपल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासाला लागले यादरम्यान पहाटेपासूनच पुन्हा फूट मसाजर केंद्रावर रांगा लागल्या अनेक भाविकांनी थकलेल्या पायांना फूटमसाजरची ऊर्जा घेऊन पुढील प्रवास सुकर केला.
अशी झाली सेवा..
माऊलीच्या सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच मुक्कामी वारकऱ्यांनी फूट मसाजर मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. यात धर्मपुरी – 2148, कारंडे – 4878, शिंगणापूर फाटा -840, नातेपुते -1617 वारकऱ्यांनी फूट मासाजरचा लाभ घेतला.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी फूट मसाजर सेवा केंद्राच्या कामाची पाहणी केली. पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना फूटमसाजरचा चांगलाच उपयोग होत असल्याबद्दल अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनीही पालखी सोहळ्याबरोबर पायी चालत सुविधांची पाहणी केली. महिला वारकऱ्यांबरोबर पायी चालत जाण्याचा त्यांनाही मोह आवरला नाही. डोक्यावर तुळस घेऊन त्यांनी माऊली, माऊली चा गजर करीत वारीचा आनंद घेतला.
चार्जिंग वाहनाचा उपयोग…
वारकऱ्यांच्या मोबाईलला चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. यासाठी पाच ऊर्जा वाहनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्या वाहनावरील स्क्रीनवर शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. ऊर्जा वाहनावर मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी वारकऱ्यांचे गर्दी पडल्याचे चित्र दिसून आले. एका ऊर्जा वाहनावर एकाच वेळी 100 मोबाईल ला चार्जिंग करण्याची व्यवस्था असून दिवसभरात 5000 वारकऱ्यांनी याचा लाभ घेतल्याचे दिसून आले.



More Stories
बा विठ्ठला… वारकऱ्यांच्या सेवेसाठी अंगी बळ दे; सीईओ कुशल जैन यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
माऊलीचा पालखी सोहळा जाणून घेण्यासाठी झेडपीचे नूतन सीईओ जैन फिल्डवर
मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हासाठी कशाला हट्ट करेन…