March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

दौऱ्यात आमदारांचा उल्लेख मग पालकमंत्री असे का बोलले?

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सर्व आमदारांसह भाजप मंडल अधिकाऱ्यांची बैठक असे नमूद केलेले असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीला आमदार अपेक्षित नव्हतेच असा खुलासा करून भाजप कार्यकर्त्यांना बुचकाळ्यात टाकल्याचे दिसून आले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बालाजी सरोवरमध्ये भाजप मंडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख हे उपस्थित नव्हते. या बैठकीनंतर पत्रकारांनी या आमदारांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधल्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बैठकीला आमदार अपेक्षित नव्हतेच असा खुलासा केला आहे. वास्तविक त्यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत काळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेल्या नियोजित दौऱ्यात मात्र सर्व आमदारांसह भाजप मंडल अधिकाऱ्यांची बैठक असा उल्लेख केलेला आहे. पण पालकमंत्री गोरे यांनी असा खुलासा केल्यामुळे गोंधळात भर पडली आहे. विशेष म्हणजे यावर टिप्पणी करताना पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांचे इंटेलिजन्स कमी पडल्याचे नमूद केले आहे. मला दोन्ही देशमुख नेहमीच भेटतात, आमच्या बैठका होतात असेही त्यांनी म्हटले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री दौऱ्यावर आल्यानंतर जाहीर कार्यक्रम व बैठकीला हे दोघे देशमुख का येत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळालेले नाही. पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांचे इंटेलिजन्स कमी पडत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्यामुळे सोलापूर भाजपमध्ये काय चालले आहे हे मात्र त्यांना नक्की माहित आहे, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

मी असेन नसेन…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. स्थानिक पालकमंत्री हवा असा कार्यकर्त्यांमधून जोर वाढला आहे. त्यामुळे भाजप वरिष्ठ स्तरावर याबाबत हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर पंढरपूर येथील कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्या मी असेन नसेन ही कामे सुरूच राहतील असे त्यांनी वक्तव्य केल्याने उपस्थितताना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोलापूर महापालिका निवडणूक यशस्वी करायचे असेल तर दोन्ही देशमुख यांची नाराजी घालवणे हे भाजपला क्रमप्राप्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे हे या कामात कितपत यशस्वी ठरतात हे येणारा काळ ठरवणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेला पालकमंत्र्यांचा दौरा…