February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बिहारमध्ये मिळाला विजय; सोलापुरात भाजपचा जल्लोष

सोलापूर : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसह एनडीएला मिळालेले घवघवीत हे बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी केले. बिहारमधील भाजपा एनडीएच्या विजयाबद्दल शुक्रवारी भाजपा शहर मध्यतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत विजय साजरा केला.

यावेळी आ. देवेंद्र कोठे यांनी भाजपा महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांना मिठाई भरवत गुलाल लावत पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय श्रीराम’ ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’, ‘बिहार चुनाव तो झाकी है, पश्चिम बंगाल बाकी है’ अशा घोषणा दिल्या.

२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बिहारमध्ये विकास घडत आहे. तेथील जंगलराज समाप्त करण्याचा निश्चय बिहारच्या जनतेने केला होता. विरोधकांनी अनेक आरोप करून देखील बिहारच्या जनतेने महागठबंधनला नाकारत भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसेच एनडीएला भरभरून यश दिले आहे. बिहारच्या जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे भाजपाचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी याप्रसंगी म्हणाले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत नागरिकांना मिठाईचे वाटप करून जल्लोष केला.

‘अबकी बार ७५ पार’

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आत्मविश्वास कायम ठेवत या पुढील सर्व निवडणुका भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकतीने आणि त्याच आत्मविश्वासाने लढण्याचे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘अबकी बार ७५ पार’ असा नारा देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, महिला मोर्चा अध्यक्षा रंजिता चाकोते, कुमुद अंकाराम, रामेश्वरी बिर्रु, विजया वड्डेपल्ली, राजकुमार हंचाटे, मेघनाथ येमुल,भारतसिंग बडूरवाले, रविसिंग कय्यावाले, जेम्स जंगम, नागनाथ कसलोलकर, काशिनाथ झाडबुके, सुनीता कामाठी, अंबादास करगुळे, नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, नागेश खरात यांच्यासह भाजपा पदाधिकारी मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र, बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.