March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

खंडणी वसुलीप्रकरणी तोतया पत्रकाराविरुद्ध सोलापुरात गुन्हा

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शिवभोजन केंद्र चालकांकडून तसेच रेशन दुकानदारांकडून खंडणी वसुली केल्याचा गंभीर प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी समता शिवभोजन केंद्राचे चालक इरफान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नितीन कांबळे या तोतया पत्रकाराविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

शेख यांच्या फिर्यादीनुसार, नितीन कांबळे याने शिवभोजन केंद्र सुरू ठेवायचे असल्यास दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कांबळे हा पुरवठा विभागाकडे खोट्या तक्रारी करीत होता. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देत होता. मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत फिर्यादी व इतर शिवभोजन केंद्र चालकांकडून एकूण 2 लाख 44 हजार 500 रुपये रोख स्वरूपात खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही रक्कम काही वेळा स्वतः तर काही वेळा केंद्र चालक अनिल भिंगारे यांच्यामार्फत घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डिसेंबर महिन्यासाठीही 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच, ऑगस्ट 2025 मध्ये हप्ता वाढवून मागण्यात आल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने, अज्ञात व्यक्तीमार्फत खोट्या तक्रारी करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

शिवभोजन योजना ही 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आलेली असून, गरीब व गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयांत सकस जेवण देणे हा तिचा उद्देश आहे. या योजनेशी संबंधित केंद्र चालकांना धमकावून खंडणी वसुली केल्याचा हा प्रकार गंभीर मानला जात असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास गोविंद पवार हे करीत आहेत.