सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच दोन अधिकाऱ्यांमध्ये तू.. तू, मै.. मैं

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच दोन अधिकाऱ्यांमध्ये वैयक्तिक कारणावरून तू तू मै मैं झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेची घडी विस्कटल्याचे चित्र दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या शिस्तीकडे दुर्लक्ष होत असतानाच आता अधिकाऱ्यांमध्येही याचा प्रभाव जाणवत आहे. चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर दोन अधिकारी भांडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महापालिका निवडणुकीमुळे बुधवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट जाणवत होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा विकास यंत्रणेच्या कार्यालयात बसून कामकाज पाहिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी नेहमीप्रमाणे बैठक घेऊन आज व्हिजिटचा दिवस असल्याने दौऱ्यावर जाणे पसंत केले. गर्दी दिसली ती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यालयात. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख हे नेहमीच्या कामकाजात व्यस्त होते. पण व्हिजिटरच नसल्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट जाणवत होता. अशात उपस्थित असलेले कर्मचारी व विजिटरमध्ये जिल्हा परिषदेत मंगळवारी घडलेल्या एका घटनेची कुजबूज सुरू होती.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी बांधकाम विभागाची बैठक घेतली. या बैठकीला कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व नरेंद्र खराडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी व खराडे यांच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासमोरच खडाजंगी झाली. खराडे यांच्या शब्दाला कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर वाद वाढण्याआधीच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी यात हस्तक्षेप केल्यामुळे पुढील वाद टळल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून बांधकाम विभागात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अधिकाऱ्यांमधील या भांडणांमुळे लोकांची करमणूक होत असले तरी जिल्हा परिषदेची मोठी बदनामी होत असल्याबाबत कर्मचाऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. एकेकाळी जिगरी दोस्त असलेले हे दोन अधिकारी हमरीतुमरीवर का आले याबाबत चर्चा सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याची वेळीच दखल न घेतल्यास याचे परिणाम जाणवतील अशी कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button