सोलापूर : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना शिक्षण विभागाच्या केंद्र परिषदेला राजकीय लोकांना निमंत्रण देऊन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कंदलगाव बीटचे केंद्रप्रमुख आमसिद्ध म्हेत्रे यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले आहेत.
याबाबत कास्ट्राईब शिक्षण संघटनेच्या दक्षिण सोलापूर शाखेने तक्रार केली आहे. 30 डिसेंबर रोजी मनगुळी येथे कंदलगाव केंद्र शिक्षण परिषद झाली. यावेळी महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू होती. असे असताना या परिषदेला राजकीय लोकांना कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. तसेच अंत्रोळी शाळेतील सातवीतील विद्यार्थिनी गौरी शिंगण हिची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली व मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतल्याचे तिला प्रमाणपत्र मिळाले. असे असताना तिचे अभिनंदन व कौतुक करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. या दोन्ही कारणामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार व केंद्रप्रमुख अमसिद्ध म्हेत्रे यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कास्टाईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे व सचिव सोमनिंग कोळी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांच्याकडे केली. त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांना केंद्रप्रमख म्हेत्रे यांची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

More Stories
मंगळवेढा न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात सुनावली आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जागेवर दिली डिजिटल अनुकंपा नियुक्ती