March 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

महापौर विनायक कोंड्याल यांच्या सतर्कतेमुळे विरोधकांची फजिती

सोलापूर :  महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या महापालिका कामकाजाच्या पहिल्याच सभेत महापौर विनायक कोंड्याल यांनी तब्बल ५२ विषयांना मंजुरी दिली. अनेक मुद्द्यांवर विरोधकांना नामोहरम करत सर्वांशी समन्वय साधून महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाची चुणूक दाखविली. दरम्यान, विरोधकांनी अनेक प्रस्ताव घाईगडबडीत दाखल केल्याने विषय चर्चेला आल्यानंतर त्यांची चांगलीच गोची झाल्याचे पाहायला मिळाले.

विरोधकांची फजिती

सभेत विरोधकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कर सवलत योजनेचा प्रस्ताव आणला होता. हा विषय चर्चेला येताच परंतु सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी यांनी ही योजना भाजपा सत्तेत असताना २०१९ पासूनच लागू असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या योजनेचा लाभ वीरपत्नी, स्वातंत्र्य सैनिक अशा घटकातील ७५० कुटुंबे घेत असल्याचेही सांगितले. विरोधकांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक असूनही विरोधकांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर प्रस्ताव आणल्यामुळे सभेत विरोधकांची पुरती फजिती झाली.

भाजपा सदस्यांचा प्रस्ताव मान्य

कर थकबाकीदारांनी ३१ मार्चपूर्वी कर भरल्यास त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून शास्ती फी मध्ये ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. परंतु अधिकाधिक कर वसुली व्हावी आणि महापालिकेत चे उत्पन्न वाढावे याकरिता सत्ताधारी भाजप सदस्यांनी ही शास्ती फी १०० टक्के माफ करावी असा प्रस्ताव सभेत सादर केला. यावर महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक निर्णय घेत १०० टक्के शास्ती फी माफी देण्याचा निर्णय घेतला. यातून कर वसुली मोठ्या प्रमाणात होणार असून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

लिंगायत स्मशानभूमीला जागा देण्याच्या विषयातही महापौर श्री. कोंड्याल यांनी योग्य समन्वय साधत श्री सिद्धेश्वर देवस्थानला अक्कलकोट रस्त्यावरील स्मशानभूमीसाठी तर होटगी मठाला जुळे सोलापूर परिसरात स्मशानभूमी तयार करण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यावरही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेण्याची तयारी सुरू असताना महापौर विनायक कोंड्याल यांनी समन्वयाची भूमिका घेतली. याबाबत सहा महिन्यांपासून प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू आहे प्रशासकीय काळात याबाबत ठराव देखील झालेला आहे. श्री सिद्धरामेश्वर देवस्थानला श्री रूपा भवानी मंदिर रस्त्यावरील रुद्रभूमीची व्यवस्था पाहण्याचा अनुभव असल्यामुळे आणि अक्कलकोट रस्त्यावरील रुद्रभूमीचे व्यवस्थापन करण्याची तयारी सर्वप्रथम देवस्थाने दाखवल्यामुळे अक्कलकोट रस्त्यावरील स्मशानभूमी श्री सिद्धरामेश्वर देवस्थानला तर जुळे सोलापुरातील स्मशानभूमी होटगी मठाला देण्याचा निर्णय करण्यात आला. यातही विरोधक ‘बॅकफूटवर’ गेल्याचे दिसले. समाज हिताच्या निर्णयात राजकारण करू नये अशी विनंतीही महापौर विनायक कोंड्याल यांनी सदस्यांना केली.

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती बांधण्यासाठीचा नियोजन आराखडा करण्यासही मंजुरी देत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक धोरणाविषयीची आपली स्पष्ट भूमिका दाखवून दिली. याशिवाय नगरोत्थान योजनेतील २ कोटी ७१ लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन नागरिकांकडून आलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राधान्य दिल्याचे दिसले.

विधानसभा सदस्यांप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांनाही प्रशासनाशी कामकाजाच्या सोयीसाठी ओळख व्हावी, योग्य समन्वय साधता यावा याकरिता बिल्ला देण्याचा प्रस्ताव नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी मांडला होता. महापौर विनायक कोंड्याल यांच्यासारख्या मोजक्या सदस्यांना जरी सोलापूर महानगरपालिकेतील १५ ते २० वर्षांच्या प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असला तरी विशेषतः नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सोयीसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व नगरसेवकांना बिल्ला देण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे नव्याने निवडून आल्यामुळे प्रशासनाशी ओळख नसलेल्या नगरसेवकांना आधार मिळाल्याची चर्चा सर्वसाधारण सभेनंतर नगरसेवकांमध्ये होती.

शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह सभागृह नेते नरेंद्र काळे, जेष्ठ नगरसेविका रोहिणी तडवळकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते तसेच भाजपाच्या अनुभवी नगरसेवकांनी सभेसमोर आलेल्या विविध विषयांमध्ये नागरिक, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात समन्वयाची भूमिका घेऊन शहर विकासाच्या विषयांना प्राधान्यक्रम देत मंजूरी दिल्यामुळे ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण राबवल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये आणि शहरवासीयांमध्ये शुक्रवारी होती.

सभागृहाबाहेर काढण्याची तंबी

मागील सर्वसाधारण सभेचा अनुभव पाहता काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ केल्याचे दिसून आले होते. ही शक्यता जाणून घेऊन महापौर विनायक कोंड्याल यांनी सभेच्या प्रारंभीच सर्व सदस्यांनी सभागृहाची शिस्त पाळावी अन्यथा सभागृहात विनाकारण गोंधळ माजवणाऱ्या सदस्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात येईल अशी तंबी दिली. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजाला तुलनेने अधिक शिस्त लागल्याचे चित्र होते.