सोलापूर : मोहोळ – १३ मैल – वळसंग या ८१ किमी नव्या रस्त्यासाठी ७४० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.
मोहोळ – १३ मैल – वळसंग या मार्गावर मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक शेतकऱ्यांची अन्नधान्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातही घडत आहेत. शेतकरी वर्गालाही या रस्त्यावरून शेतमालाची वाहतूक करणे जिकरीचे होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. वारंवार होणाऱ्या लहान मोठ्या अपघातांमुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मोहोळ – १३ मैल – वळसंग या मार्गाच्या बांधणीकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. लवकरच या कामाची प्रक्रिया सुरुवात होणार आहे.
जिल्ह्याच्या विकासातील नवा अध्याय
या नव्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून शेतमालाची बाजारपेठेपर्यंतची वाहतूक जलद आणि कमी खर्चात होणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह शेजारील प्रदेशांच्या व्यापार आणि उद्योगालाही या रस्त्यामुळे मोठी गती मिळणार आहे. हा रस्ता म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या विकासातील नवा अध्याय ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे सोलापूर जिल्हावासियांतर्फे आभार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मानले आहेत.

More Stories
गड संवर्धनासाठी जाणाऱ्या मावळे व खासदार लंके यांचा सन्मान
सोलापूर जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन साजरा
झेडपी सीईओंचा पीए भारी; गार्डच्या बदनामीची पुरी तयारी