सोलापूर : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीवरून अक्कलकोट मधील वातावरण बरेच तापले आहे. या बदली प्रकरणात आरोग्य व प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांची हात मिळवणी असल्याचा आरोप वागदरी गटाचे झेडपी सदस्य प्रवीण तानवडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
अक्कलकोट तालुक्यात शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक नागनाथ होटकर यांच्या बदलीवरून रान पेटले आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व माजी सदस्य आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषदेत येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेऊन तक्रार करूनसुद्धा अद्याप काहीच हालचाल न झाल्यामुळे आता झेडपी सदस्य प्रवीण तानवडे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. याबाबत तानवडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांना दिलेल्या तीन पानी निवेदनात होटकर बदली प्रकरणात कोणा कोणाचा हात आहे याबाबत पोलखोल केली आहे.
आरोग्य सेवक होटकर यांची प्रशासकीय बदली प्रा.आ. केंद्र शिरवळ उपकेंद्र किणी ता. अक्कलकोट येथून प्रा. आ. केंद्र वैराग उपकेंद्र धामणगांव ता. बाशी येथे झाली होती. तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या आदेशाचे अवमान करुन त्यांना कार्यमुक्त केले नाही. होटकर यांची प्रशासकीय बदली पुन्हा प्रा.आ.केंद्र शिरवळ उपकेंद्र किणी अक्कलकोट तालुक्यातुन प्रा.आ.केंद्र पाटकुल उपकेंद्र पोखरापूर ता. मोहोळ येथे झाली. ते तेथेही हजर न होता पुन्हा प्रा.आ. केंद्र शिरवळ उपकेंद्र किणी ता. अक्कलकोट मधून प्रा.आ. केंद्र बोरामणी ता.द. सोलापूर येथे झाली आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचा प्रशासकीय बदल हा एकदाच केला जातो. तो कर्मचाऱ्याच्या सोईने तीन तीन वेळा बदल केला जात आहे हे आपल्या निर्दशनास आणू इच्छितो असे तानवडे यांनी नमूद केले आहे. याबाबत मी आपणास सविस्तर पत्र देवून यापूर्वीच कळविले आहे. त्यावेळी आपण जबाबूदार असणाऱ्या संबंधीतावर कारवाई करण्याचा मला शब्द दिला होता. परंतु अध्याप ही कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.
आरोग्य सेवक होटकर यांची प्रशासकीय बदली 2025 मध्ये केलेली होती. 2026 ची प्रशासकीय बदल्याची यादी तयार करतेवेळेस आरोग्य विभाग यांच्या ही बाब लक्षात येऊनही वरीष्ठाना निर्दशनास आणून न देता. संबधीत आरोग्य विभागातील लिपिक स्वामी, इंगळे, कक्ष अधिकारी गिरीश जाधव यांनी अंधारात ठेवून होटकर यांच्याशी हात मिळवणी करुन होटकर यांना सोईच्या ठिकाणी पुन्हा प्रशासकीय बदलीच्या यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या प्रशासकीय बदलीच्या संपूर्ण नस्ती तपासणी कामी प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविण्यात आल्या.
सामान्य प्रशासन विभागामध्ये नस्ती तपासणी कामी आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागातील लिपिक केंद्रे, अधीक्षक सचिन सांळुखे, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे यांच्याही लक्षात आलेले असताना आरोग्य विभागातील लिपिक स्वामी यांनी प्रशासन विभागातील वरील तीन कर्मचाऱ्याचे हात ओले करुन गप्प बसविण्यात आले आहे असे दिसून येते.
आरोग्य सेवक होटकर यांची मोहोळ येथे प्रशासकीय बदली झाली होती त्यांची अंमलबजावणी न करता पुनश्: दि.31.05.2026 रोजी प्रशासकीय बदलीचे आदेश काढले आहेत. वास्तविक पहाता दि.14.05.2026 ला बदली प्रक्रिया समुपदेशनद्वारे पार पाडण्यात आली यांचा अर्थ आरोग्य सेवक होटकर यांनी त्यांच्या सोईच्या ठिकाणी पदस्थापना त्यांच्या मर्जीने घेण्यात आलेली होती. पुन्हा होटकर यांनी आरोग्य विभागास हाताशी धरुन पुन्हा बदलीचे ठिकाण बदलण्यासाठी नस्ती मंजूर करुन सामान्य प्रशासन विभागाकडे दि.06.07.2026 रोजी पाठविण्यात आली. सदर नस्तीवर सामान्य प्रशासन विभागाने शासनाने आखून दिलेला प्रशासकीय बदल्याचा कालावधी संपलेला आहे असा शेरा मारुन सदरची नस्ती आरोग्य विभागाकडे परत करणे आवश्यक होते. परंतु तसे घडलेले दिसून येत नाही यावरुन असे लक्षात येते की आरोग्य विभागातील स्वामी क्लार्क, इंगळे अधीक्षक, गिरीष जाधव कक्ष अधिकारी यांनी व प्रशासन विभागातील केंद्रे, क्लार्क, सचिन सांळुखे, अधीक्षक, अविनाश गोडसे, कक्ष अधिकारी यांनी 100 टक्के आर्थीक व्यवहार करुन आपली दिशाभूल केलेली आहे हे स्पष्ट दिसून येते असा झेडपी सदस्य तानवडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे.
या गडबडी कशा झाल्या…
आरोग्य सेवक होटकर यांच्या बदल्या करताना गडबडी कशा झाल्या याचे पुरावे तानवडे यांनी दिले आहेत. होटकर यांची नस्ती आपल्या कार्यालयाकडे दि.08.07.2026 रोजी प्राप्त झालेली आहे व त्या नस्तीवर आपली स्वाक्षरी दि.09.07.2026 रोजी झालेली आहे असे दिसून येते व सदरची नस्ती आरोग्य विभागाकडे दि.09.07.2026 रोजी परत गेली आहे. होटकर यांचा नव्याने प्रशासकीय बदलीच्या आदेशामध्ये कार्यालयीन मंजूर टिपणी दि.31.05.2026 व आदेश क्रं. जाक्र/जिपसो/आरोग्य/कार्या-21/3616/2026 सोलापूर दि.31.05.2026 या जावक क्रमाकाने आदेश काढण्यात आलेला आहे. सदर दिवशी रविवार शासकीय सुट्टी असताना देखील आदेश काढण्यात आले आहेत. यावरुन सदर. कर्मचाऱ्याना सुट्टी असल्याचे ही भान राहिले नाही.
आपले वरील कर्मचारी संगनमताने कार्यालयीन आदेशात आपल्या परस्पर आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आपली दिशाभूल करत आहेत यावरुन आपली व जिल्हा परिषदेची प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी वरील आरोग्य व सामान्य प्रशासन विभागातील दोषी असणारे सहा कर्मचाऱ्याचे निलंबन करावे व अशा किती नियमबाह्य बदल्या केल्या आहेत याची चौकशी करावी. तसेच तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांनीही होटकर यांना आपल्या आदेशाचे अवमान केल्याने त्यांच्यावरही प्रशासकीय कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

More Stories
सोलापुरात पुलाच्या उतारावर स्कूलबसचे ब्रेकफेल
नेहरू वसतिगृहात येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचा निर्णय
सोलापूर झेडपीच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन