सोलापूरजिल्हा परिषद

तर मग मला आंदोलनच करावे लागेल; सभापती संस्कृती सातपुते झेडपी प्रशासनावर संतापल्या

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व दिव्यांग कल्याण विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. असे असताना समाजकल्याणमधील कर्मचाऱ्यांवर कारवाई होत असेल व प्रशासन माझं ऐकत नसेल तर मग मला आंदोलन करावे लागेल, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

स्थायी समितीची सभा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते ह्या शुक्रवारी जिल्हा परिषदेत आल्या होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व सदस्यांच्या उपस्थितीत स्थायी समितीची सभ झाली. आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त पंढरपूरला आल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सभेला हजर नव्हते. त्यामुळे मागील सभेचा इतिवृत्त कायम करणे  व विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे इतर कोणतेही विषय न घेता आषाढी यात्रेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. 27 जून रोजी पालखी मार्गावर दौरा करून पंढरपुरात आढावा बैठक घेण्याचे यावेळी ठरले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्याहस्ते जिल्हा परिषदेसमोरील बागेत वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी समाजकल्याण कार्यालय, वाचनालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सभापती सातपुते यांनी वाचनालय व कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी अधिक निधी द्यावा अशी मागणी केली.

त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. चर्चेवेळी समाजकल्याण कार्यालयातील अतिरिक्त कामकाज पाहणारे विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांच्यावरील कारवाईचा विषय आला. यावर सभापती सातपुते संतापल्या. समाजकल्याण व दिव्यांग कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. जे कर्मचारी काम करीत आहेत त्यांनाही अशा पद्धतीने रोखणे बरोबर नाही. मी पदभार घेतल्यापासून त्यांना काम करताना पाहिले आहे. त्यांची बदली करण्याबाबत मला सूचना देण्यात आली होती. पण कारवाई करण्यात आल्याचे मी माध्यमातूनच वाचले. यामागे सुडाचे राजकारण असल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. समाजकल्याण व दिव्यांग कल्याणच्या योजना राबविण्यासाठी दोन्ही कार्यालयाला कर्मचाऱ्यांची गरज आहे. याबाबत मी पालकमंत्र्यांशीही बोलले आहे. तरीही  जिल्हा परिषदेचे प्रशासन आमचेही ऐकत नसेल तर मला आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आता सभापतींनीच असा संताप व्यक्त केला असेल तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button