सोलापूरजिल्हा परिषद

सीईओ कुलदीप जंगम यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते यासाठी झाला सन्मान

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना आज रोजी मंत्रीमंडळ सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषदेने सेवाकर्मी कार्यक्रमातील विविध निकषांवर १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ज्येष्ठता सूची, पदोन्नती व सरळसेवा नियुक्तीची स्थिती, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्णता आणि सेवापुस्तक अद्ययावत करणे या सर्व बाबींमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श ठसा

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यांकन करण्यासाठी सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यातील इतर सर्व जिल्हा परिषदांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला.

गुणांकन अहवालानुसार

– ज्येष्ठता सूची : ५७ पैकी सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठता सूची प्रसिद्ध (१०/१० गुण).

– पदोन्नती नियुक्ती : मंजूर ९५९ पदांपैकी ८२० कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण १४.४९% असूनही कार्यवाही उत्कृष्ट (१०/१० गुण).

– सरळसेवा नियुक्ती : मंजूर १३,००७ पदांपैकी ११,४२५ कार्यरत, रिक्त पदांचे प्रमाण १२.१६% (१०/१० गुण).

– बिंदुनामावली प्रमाणीकरण : ५७ पैकी ५५ संवर्गांची बिंदुनामावली प्रमाणित (९४.७४%) (१०/१० गुण).

– अनुकंपा नियुक्ती : उपलब्ध १६८ पदांवर सर्व नियुक्त्या पूर्ण (१०/१० गुण).

– iGOT पोर्टल प्रशिक्षण : १२,१२७ कर्मचाऱ्यांपैकी सर्वांचे रजिस्ट्रेशन पूर्ण, त्यापैकी ९५.१०% कर्मचाऱ्यांनी ५ कोर्स पूर्ण केले (१०/१० गुण).

– सेवापुस्तक अद्ययावत : १२,१२७ पैकी १२,०३९ सेवापुस्तके अद्ययावत (९९.२७%) (२०/२० गुण).

या सर्वांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी केवळ सोलापूर जिल्हा परिषदेपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्हा परिषदांसाठीही आदर्श ठरली आहे.

“महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटला व राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्हा परिषदेने केलेली ही कामगिरी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक कामाचे यश आहे. हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे, परंतु आपली जबाबदारी अधिक वाढलेली असून पुढे असेच काम करत राहू याची खात्री ही आहे.”

कुलदीप जंगम

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button