सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने टाकली “कात’

शिक्षणाधिकाऱ्याचे कार्यालय चकाचक ; समायोजनात मिळाली 27 जणांना नियुक्ती

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने “कात’ टाकली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय चकाचक झाले असून या विभागाने अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या विशेष कॅम्पमध्ये 27 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समायोजनाद्वारे इतर शाळांवर नियुक्ती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विभागावर बैठका घेऊन या कामाला गती दिली आहे. माध्यमिक शिक्षण विभाग या उपक्रमात मागे होता. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षण विभागाला भेट देऊन माध्यमिक शिक्षण विभागाला मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसाच्या उपक्रमातील सात कार्यक्रम प्राधान्याने घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना दिल्या होत्या. यात माध्यमिक शिक्षण विभागासाठी रेकॉर्ड रूमची आवश्यकता होती. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी माध्यमिकच्या रेकॉर्ड रूमसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात अस्ताव्यस्त पडलेल्या फायली या रेकॉर्डरूममध्ये हलविल्या आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग पहिल्यांदाच स्वच्छ झाला आहे. अस्ताव्यस्त दिसणाऱ्या फायली कार्यालयातून गायब झाल्याने शिस्तीचे दर्शन होत आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी उच्च न्यायालयातील सुनावण्यातील वेळ काढून माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कॅम्प घेतला. यासाठी अतिरिक्त झालेले कर्मचारी व संस्थाचालकांना बोलवण्यात आले होते. यात अतिरिक्त झालेल्या 21 कर्मचाऱ्यांना इतर शाळांवर नियुक्ती दिल्याचे शिक्षण अधिकारी जगताप यांनी सांगितले. या कॅम्पमध्ये अल्पसंख्यांक शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायिक प्रकरणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी वेळ देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.  माध्यमिक शिक्षण विभागाला कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. लवकरच कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button