सोलापूरजिल्हा परिषद

टेन्शन..! तिकडे पालकमंत्री इकडे आडवी जीप

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेसमोर इतके प्रशस्त आवार असतानाही पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. पार्किंगचा फटका शुक्रवारी जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बसला आहे. एका जीपच्या बेशिस्त पार्किंगमुळे या अधिकाऱ्याला अर्धा तास टेन्शनमध्ये ताटकळत राहावे लागले आहे. यातून गंभीर समस्या निर्माण होण्याआधीच झेडपीतील पार्किंगला शिस्त लावावीच लागणार आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्य व ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात येत आहेत. शुक्रवारी या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात तोबा गर्दी झाली होती. कर्मचाऱ्यांच्या दुचाकी व चार चाकी वाहनामुळे पादचाऱ्यांना उभे राहण्यासही मोकळी जागा नव्हती. चारचाकी वाहनधारक मिळेल त्या जागेमध्ये आपले वाहन पार्क करून गायब झाले होते. यामुळे अधिकाऱ्यांचे पार्किंगही फुल्ल झाले होते. समाजकल्याण विभागासमोर अधिकाऱ्यांच्या वाहनांना पार्किंग करण्यासाठी खास शेड उभे करण्यात आले आहे. या शेडमधील गाड्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पार्किंग राखीव केल्याचे फलक लावले आहेत. तरीही वाहनधारक या फलकाकडे न पाहता वाहने पार्किंग करताना दिसून येत आहेत.  शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे सांगोला तालुक्यात दौऱ्यावर येणार असल्याचा संदेश येताच त्यांचा प्रोटोकॉल सांभाळण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपसंचालक अमोल जाधव यांना जबाबदारी देण्यात आली. सांगोल्याकडे रवाना होण्यासाठी शुक्रवारी दुपारी ते तातडीने कार्यालयातून निघाले. पार्किंगमध्ये आल्यानंतर त्यांना त्यांच्या गाडीसमोर आडवी एक जीप उभी केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना आपली गाडी बाहेर काढता येईना. त्यांनी झेडपीतील वॉचमनना तेथे बोलावले. पण त्या जीपचा चालक किंवा मालकही सापडेना. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी पाणीपुरवठा कार्यालयातील कर्मचारी धावले. जीपच्या नंबर प्लेटवरवरून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. यातून निष्पन्न झालेल्या नावावरून जीप ठेकेदाराची असल्याच्या संशयावरून ग्रामपंचायत व बांधकाम विभागात त्या मालकाचा शोध घेण्यात आला. पण उपयोग झाला नाही. यात अर्धा तास वेळ गेल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांचे टेन्शन वाढले. शेवटी कर्मचाऱ्यांनी सर्वत्र धावपळ करून त्या जीपच्या चालकाचा शोध घेतला. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी एका आरोग्य कर्मचाऱ्यांना घेऊन ती जीप आली होती. जीप हलवल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना सांगोल्याकडे जाता आले. पण यात आणखी वेळ गेला असता तर पालकमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा प्रश्न गंभीर झाला असता. जिल्हा परिषदेतील बेशिस्त पार्किंगचा अधिकाऱ्यांनाच आता फटका बसू लागला आहे. अधिकाऱ्यांना राखीव असलेल्या पार्किंगमध्ये आरोग्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडे येणाऱ्या लोकांची नेहमीच घुसखोरी असते. माजी पदाधिकारी, ठेकेदार व त्यांचे कार्यकर्ते हेही या पार्किंगमध्ये घुसताना दिसून येत आहेत. या पार्किंगसाठी नियमावली सक्तपणे राबवावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button