सोलापूरकृषी

शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती : दीपक वैद्य

सोलापूर : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, शिवमूर्ती सिद्धाराम, कुमार काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत, शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर रामचंद्र माळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी प्रास्ताविक करत कृषी दिनाचे महत्त्व, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन केलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्ष रोप,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी मार्गदर्शन करताना प्रगतशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये योगदान देणेबाबत आवाहन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी ” एल निनो काळात आपत्कालीन पीक व्यवस्थापन व सोयाबीन व तूर लागवडीची पंचसूत्री तसेच खरीप हंगामाचे नियोजन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत, कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड.अमृता वाघे यांनी “एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो.” शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टामुळे प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचते. त्यामुळे शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा भक्कम आधार आहे असे सांगितले.

समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी, “मी स्वतः एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची, वेदनेची आणि तळमळीची मला पूर्ण जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील,” असे सांगत शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती यांनी केले, तर कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button