महापालिकासंघटना-संस्थासामाजिकसोलापूर

‘चिमणी” पाडणारे शहर, सोलापूरची नवीन ओळख

ऐतिहासिक चिमणी पाडल्याबद्दल व्यक्त होत आहे मनपाविरुद्ध रोष

सोलापूर : सोलापूर महापालिकेने एक वर्षात दोन ‘चिमण्या” पाडण्याचा विक्रम केला आहे. यातील एक चिमणी ‘बेकायदा” ठरवून तर दुसरी ऐतिहासिक चिमणी ‘धोकादायक” ठरवून पाडण्यात आली आहे. लक्ष्मी मिलची ही “चिमणी” पाडल्यानंतर नागरिक व कामगार वर्गातून महापालिकेविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोलापुरात अनेक धोकादायक इमारती आहेत. त्यात या ‘चिमणी”ने कोणाला धोका निर्माण झाला असता? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

‘गिरणगाव सोलापूर” अशी ओळख निर्माण करणाऱ्या सोलापुरात सात कापड मिल होत्या. त्यात जुन्या गिरणीची चिमणी व भोंगा प्रसिद्ध होता. पुणे किंवा मंगळवेढामार्गे सोलापुरात आल्यानंतर या चिमण्यांचे वैभव बाहेरच्या पाहुण्यांना खुणावत होते. मंगळवेढा रोडवर मरीआई चौकात डाव्या बाजूला लक्ष्मी- विष्णूच्या दोन वैभवशाली चिमण्या सर्वांचे लक्ष वेधत होत्या. या मिल बंद पडल्यानंतर खाजगी विकसकांनी जागा विकत घेतली. विष्णू मिलच्या जागेत असलेली दगडी चिमणी यापूर्वीच अर्धवट पाडण्यात आली आहे. त्यानंतर लक्ष्मी मिलच्या जागेत ही दुसरी चिमणी उभी होती.  ब्रिटिशाच्या कालावधीत सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ही चिमणी उभारली असा इतिहास सांगितला जात होता. सोलापूर महापालिकेने शहरातील जुन्या वास्तूचे जतन करण्यासाठी तयार केलेली हेरिटेज इमारतीच्या यादीत ए ग्रेड मध्ये ही चिमणी होती. महापालिकेवर सध्या प्रशासक राज सुरू आहे.  असे असताना तीन महिन्यापूर्वी महापालिकेला ही चिमणी धोकादायक झाल्याचा साक्षात्कार झाला आणि बांधकाम विभागाने संबंधित जागा मालकास नोटीस दिली आणि त्यानंतर प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी ही चिमणी जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सोपस्कारपणे पार पाडली गेली. पण ही चिमणी पाडल्यानंतर या मिलचे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. लक्ष्मी मिलची शेवटची ओळख याद्वारे पुसली गेली आहे. सोलापूर महापालिकेने वर्षभरात दोन चिमण्या पाडल्या. पहिली चिमणी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची. ही चिमणी बेकायदा ठरवून जून 2023 मध्ये पाडण्यात आली तर आता लक्ष्मी मिलची ही ऐतिहासिक चिमणी धोकादायक ठरवून पाडण्यात आली. त्यामुळे जगभरात सोलापूर शहराचे ‘चिमणी पाडणारे शहर” म्हणून आता नवीन ओळख झाली आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. तरीही या काळात हे काम झाले. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. कोणीही या कृत्याबद्दल ब्र शब्द काढलेला नाही हे येथे उल्लेखनीय. आता लोक काय म्हणतात ते पाहूया…

‘1992 मध्ये आयटीआय झाल्यानंतर लक्ष्मी मिलच्या रिंगफ्रेम विभागात मी फिटर म्हणून काम केले. बारा तासासाठी 60 रुपये रोजगार होता. त्यामुळे या चिमणीचा मी साक्षीदार आहे. अशी ऐतिहासिक चिमणी पाडणे बरोबर नाही. हेरिटेज यादीत असलेल्या या चिमणीचे पाडकाम नियमाप्रमाणे झाले का? याचा शोध घेणे गरजेचे आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न महत्त्वाचा असताना महापालिका आयुक्तांनी लोकांचा विश्वासघात केला आहे”.

अशोक ढोणे, मिल कामगार

‘लक्ष्मी- विष्णू” चे कामगार नेते शिवानंद बसवंती हे माझे मामा होत. त्यांनी आयुष्यभर कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. ते आज असते तर त्यांनी ही चिमणी पडू दिली नसती. ही चिमणी पाडण्यात आल्याने सोलापुरातील ‘लक्ष्मी” गेली आहे. चिमणीच्या परिसरात लोकवस्ती नसताना कोणाला धोका झाला असता याचे महापालिका प्रशासनाने उत्तर दिलेच पाहिजे. ही चिमणी धोकादायक ठरवून पाडण्याची घाई का केली? कोणी याचा अभिप्राय दिला? याचा स्थानिक आमदारांनी जाब विचारावा”.

नितीन करजोळे, नमो श्रमिक संघटना

‘महापालिकेने हेरिटेज यादीत असलेली ऐतिहासिक चिमणी पाडून लोकांचा विश्वासघात केला आहे. प्रशासक असताना धोरणात्मक निर्णय घेण्याचा महापालिका आयुक्तांना अधिकार आहे काय? चिमणीच्या परिसरात लोकवस्ती नसताना कोणाला धोका होणार होता? मनपा अधिकाऱ्यांनी मिली- जुली करून हा परस्पर निर्णय घेतला आहे. जाहीर प्रसिद्धीकरण करून करून लोकांचे मत घ्यायला हवे होते. हा निर्णय घेण्यास घाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत मी शासनाकडे तक्रार करणार आहे”.

दत्ता धनके, शिवराज्य सेना

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button