
सोलापूर: नागाने दंश केला तरीही न घाबरता रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. तब्बल 121 तासानंतर घरी परतलेल्या शिक्षकाच्या हृदयस्पर्शी धाडसाचं सर्वत्र कौतुक आहे. या शिक्षकाचे नाव आहे मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद.
झाले असे श्रीक्षेत्र मार्डी-नरोटेवाडी रस्त्यालगत काशिद यांचा मळा आहे. गुरु नागनाथ महाराज यांचे निस्सिमभक्त,सेवेकरी तथा मंगळवेढा येथील इंग्लीश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदावर कार्यरत असणारे कडक शिस्तीचे शिक्षक,रविंद्र सदाशिव काशिद हे कॉलेजला सुट्टी असल्याने रविवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी घरीच होते. मंगळवेढा येथे आपल्या सहकारी शिक्षकाच्या घरी पितृपक्ष पंधरवड्याच्या निमित्ताने पितुर म्हणून ते जेवायला गेले होते त्यानंतर ते तेथून पंढरपूरचे काम आटपून सायंकाळी ते शेतमळ्यात आले. शिक्षक म्हणून त्यांची ओळख असली तरी त्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्याच्या आवड आहे. शेती बरोबरच त्यांच्या शेतात जनावरेही आहेत. जित्राबांना घाईगडबडीत चारापाणीची व्यवस्था
करीत होते. घरासमोर वाटेत असलेल्या लाल मातीच्या विटेला उजव्या हाताने उचलून बाजूला ठेवत असतानाच,त्या विटेखाली गारव्याला दबा धरून बसलेल्या कोब्राने(नाग) क्षणांचाही विलंब न लावता काशिद यांच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या नखाजवळ अतिशय चपळाईने दंश केला.
रविंद्र काशिद यांना कोब्राने दंश केल्याचे लक्षात येताच आपल्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न आणता अतिशय चतुराईने व धाडसाने तो साप पलटी मारण्याच्या आत त्यास शिताफीने पकडून पिशवीत घातले.त्यानंतर जुन्या काळातील प्रथमोपचार म्हणून लिंबाच्या झाडाची पाने खाऊन लगेच दंश केलेल्या भागावर ब्लेडच्या साह्याने तो भाग रक्तबंबाळ करून करंगळीला दोरीने घट्ट बांधले.
त्यानंतर त्यांनी ही घटना मोबाईलवरून सख्खाभाऊ जगन्नाथ काशिद व पुतण्या प्रशांत काशिद यांच्या कानावर घातली.लगेच गावांतून जगन्नाथ काशिद व त्यांचा मुलगा प्रमोद काशिद हे मळ्यात आले. जणू काही घडलेच नाही या आविर्भावात रविंद्र काशिद हे दिसून आले. परंतु त्यांच्या सौभाग्यवती व मुलगा रोहीतने त्यांना साप चावल्याचे सांगितले. सर्वांना तो साप विषारी तर नसेल ना ? अशी भीती वाटू लागली.
काशीद यांनी तातडीने १०८ नंबर डायल केला. पण ॲम्ब्युलन्स येण्याची चिन्हे दिसेनात. वेळेत उपचारासाठी सोलापूरला जाणे गरजेचे असल्याने,स्वतःला साप चावला असतानाही अतिशय धाडसाने रविंद्र काशिद यांनी स्वतःची चारचाकी कार गाडी काढली.तुला वाटेत केव्हाही उलटी अगर चक्कर येईल यासाठी तु प्रमोदला गाडी चालवू दे अशी विनवणी भाऊ जगन्नाथ करु लागले,परंतु त्यांनी त्यास नकार देवून त्या गाडीचे सारथ्य स्वतःच केले.ही बाब पुतण्या प्रशांत यांना कळताच त्यांनी मित्र नंदकुमार महापूरे यांस सारथ्य करण्यास सांगितले. त्याने विनवणी करूनही रविंद्र यांनी गाडीच्या स्टेरींगवरील ताबा नाही सोडला.
पाऊण तासात सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील तातडीच्या विभागाजवळ दाखल झाले. तेथे पुतण्या प्रशांत व रणजित यांच्या मदतीने कॅज्युअलटी गाठली.रविवार सुट्टीचा दिवस असूनही रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असल्याने डॉक्टर मंडळींना उसंतही मिळत नव्हती,एवढ्यात तेथील डॉक्टरांनी विचारले,अहो..बाबा… हातात कसली पिशवी घेवून रुग्णालयात आलाय दाखवू का ? या पिशवीत काय आहे ते असे म्हणून जगन्नाथ काशिद डॉक्टरांसमोर गेले. पिशवीतील या सापाने माझ्या भावास दंश केला आहे असे सांगून तातडीने उपचार सुरू करा अशी विनंती केली. हात जोडून माझ्या भावाला वाचवा डॉक्टरसाहेब अशी विनंती जगन्नाथ काशिद करू लागले.
त्यानंतर रुग्णालयात तातडीच्या विभागात कार्यरत असणारे संबंधित डॉक्टरांच्या चमुने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन रविंद्र काशिद यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले.डॉक्टरांना प्रथमदर्शनीच उपचार करताना लक्षात आले की, या व्यक्तीस अतिशय विषारी साप चावला आहे. त्यांनी उपस्थित नातेवाईकांना बाजूला घेवून कल्पना दिली.पण साप चावलेल्या रविंद्र काशिद यांनी डॉक्टर माझ्यावर लवकरात लवकर उपचार करुन डिस्चार्ज द्या. उद्या मला ड्युटीवर जायचे आहे असे सांगितले. सर्पदंश रुग्णाचे हे बोल ऐकताच डॉक्टरही अवाक झाले. तुम्हाला सकाळी नक्की सोडतो असे म्हणून डॉक्टरांनी उपस्थित नातेवाईकांना बाजूला बोलावून सापाच्या भीती व्यक्त केली. साप अत्यंत विषारी आहे, याबाबत फक्त पेशंटला कळू देवू नका असे सांगितले. त्यानंतर पेशंटला “A” ब्लॉक मधील अतिदक्षता विभागात हलवले.त्यावेळी उपस्थित असणारे सदर पेशंटचे धाडस बघून लोक अवाक झाले.आपापसात चर्चा करु लागले की सदर पेशंटचे धाडस किती आहे की आपणास जणू काय झालेच नाही या आविर्भावात पेशंट वावरत आहे.सर्व बघणारे त्यांच्या धाडसाचे नातेवाईकांजवळ कौतुक करीत होते.
अतिदक्षता विभागातील संबंधित डॉक्टरांच्या चमुने तातडीने सामुहिक प्रयत्न करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सदर पेशंटवर उपचार करण्यास सुरुवात केली.त्यावेळी संबंधित डॉक्टरांनी आम्हा नातेवाईकांना बोलावून पेशंटला फक्त तुम्ही झोपू देवू नका तसेच त्यांना भरपूर पाणी पिण्यासाठी देत रहा व त्यांच्याशी गप्पागोष्टी करत रहा असा सल्ला दिला.
रविवार ची मध्यरात्री संपली सोमवार सुरू झाला. त्यावेळी एका डॉक्टराने विचारले की,हे एका कॉलेजचे प्राचार्य असूनही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातच आणण्याचे कारण काय ? असं सहज गंमत्तीने विचारले. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की,विषबाधेच्या संदर्भात चांगले उपचार आजच्या घडीलाही सिविल हॉस्पिटलमध्येच होतात व अतिशय निष्णात डॉक्टर मंडळी या ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आम्ही विश्वासाने येथे आलो आहोत असे सांगितले. त्यानंतर तेथील डॉक्टरमंडळींनी त्यावर अतिशय उत्साहाने या पेशंटवर उपचार करुन त्यांना जीवदान मिळवून दिले. रविवार ते शुक्रवार असे सहा दिवस म्हणजेच एकूण तब्बल १२१ तासांच्या उपचारानंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रविंद्र काशिद हे आपल्या शेतमळ्यातील घरी सुखरूप परतले. त्यांना जीवदान मिळणेकामी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील निष्णात डॉक्टर मंडळींनी व तेथील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न केले.तसेच त्यांचे भाऊ जगन्नाथ काशिद,पुतण्या रणजित काशिद,प्रशांत काशिद,प्रमोद काशिद व श्रीधर मस्के व काशिद परिवारावर प्रेम करणाऱ्या सवंगड्यानी अधिकाधिक परिश्रम घेतले.म्हणूनच म्हणतात “देव तारी त्याला कोण मारी”



