बापरे… सोलापुरात छत्तीसगडहून आणलेला 36 किलो गांजा जप्त

सोलापूर: परराज्यातुन अंमलीपदार्थ (गांजा) आणुन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरुणांना सोलापूर ग्रामीण पोलीस साच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद 36 किलो 270 ग्रॅम असा एकुण 7 लाख 55 हजार 400 रुपयाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर जिल्हयामध्ये गांजाची वाहतुक व विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विक्री व वाहतूकीबाबत माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास गांजा व ड्रगची वाहतुक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवरती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक हे सोलापुर तालुका ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालयात हजर असताना, त्यांचे पथकातील पोहेकॉ मोहन मनसावाले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे दोघे छत्तीसगड राज्यातील जगदलपुर येथुन गांजाची वाहतूक करुन विक्री करण्याकरीता बोरामणी शिवारातील हॉटेल वैष्णवीजवळ येणार असल्याबाबत माहिती दिली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मनसावालेे यांनी दिल्यानंतर त्यांनी एन.डी.पी.एस कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेकरीता वरिष्ठांची परवानगी घेवून वर नमूद बातमी प्रमाणे सापळा कारवाई करणेकरीता गेले. मिळालेल्या बातमीप्रमाणे नमूद ठिकाणी सापळा लावून शोध घेत असताना हॉटेल वैष्णवीसमोरील डांबरी रस्त्याच्या बाजूस रोडलगत दोन इसम दोन मोठया बॅगासह उभे असल्याचे दिसले. मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने, त्यांना जागीच पकडले. पकडलेल्याना नांव व पत्ता विचारल्यावर त्यांनी ओळख दिली. सचिन लक्ष्मण बनसोडे, (वय 39 वर्षे, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर, एकनाथ नामदेव लेंढवे (वय 33 वर्षे, रा. मेथवडे, ता. सांगोला जि.सोलापूर) अशी नावे सांगितली. त्यांचे ताब्यातील दोन्ही बॅगांची तपासणी केली असता, त्यामध्ये निळयारंगाच्या 2 प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण 36 किलो 270 ग्रॅम गांजा आढळला. आरोपींनी हा गांजा जगदलपूर येथून विकत आणला असून तो अनिल लक्ष्मण रोंगे, (रा. खर्डी, पंढरपूर, ता. पंढरपूर जि. सोलापूर) याला विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिल रोंगे याची माहिती काढून मोहोळ येथून त्यालाही ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.
वरील तीन्ही आरोपीतांविरुध्द पोहेकॉ मोहन मनसावाले यांनी फिर्याद दिल्याने, सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, सपोनि भिमगोंडा पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतिष बुरकुल यांनी भाग घेतला.



