सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सीईओ कुलदीप जंगम यांनी “माध्यमिक’ ला घेतले सिरीयस

"जहागीर' समजणाऱ्यांची होणार उचलबांगडी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात नेहमी होणाऱ्या गोंधळाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सिरियसली घेतले आहे. दहावीची परीक्षा संपल्याबरोबर त्यांनी मंगळवारी माध्यमिक विभागाची बैठक घेऊन कामकाज सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळाबाबत गेल्या महिन्यापासून तक्रारी वाढल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप बराच काळ कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे अनेक कामे प्रलंबित असल्याच्या शिक्षकांच्या व संघटनांच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे आल्या होत्या. कामानिमित्त आलेल्या अनेक शिक्षक जिल्हा परिषदेच्या बागेत हताश नजरेने बसलेले स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी अनेक वेळा पाहिल्यामुळे हे चित्र बदलणार असा त्यांनी निर्धार केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व नियुक्त्या पारदर्शकपणे पार पडल्यानंतर त्यांच्या या मोहिमेचे विशेष कौतुक झाले आहे. अशीच मोहीम माध्यमिक शिक्षण विभागामध्ये राबवावी, अशी मागणी अनेक कर्मचारी व त्यांना भेटावयास येणाऱ्या लोकप्रतिनिधीनी व्यक्त केली होती. दहावीची परीक्षा संपल्याबरोबर हे चित्र बदलण्याची तयारी केली जाईल, असे त्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. ठरल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंगळवारी माध्यमिक शिक्षण विभागाची बैठक घेतली. या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सीईओ जंगम यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे सध्याचे कामकाज जाणून घेतले. प्रलंबित असलेल्या सर्व फायलींचा डाटा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. माध्यमिक विभागात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी आहेत. “त्या’ कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत व कामाबाबत गोपनीय अहवाल तयार करण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षण विभागात कर्मचारी कमी असल्याची कैफियत शिक्षणाधिकाऱ्यांनी मांडली आहे. त्यावर किती कर्मचारी लागतात याबाबत मागणी करावी, अशीही सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शिक्षण अधिकारी जगताप यांनी प्रशासन विभागाला पत्र दिल्याचेही सांगण्यात आले.

माध्यमिक शिक्षण विभागात काही कर्मचारी जहागीर असल्याप्रमाणे कामानिमित्त आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याशी वागतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाले आहेत. या बातम्यांच्या कात्रणावर टिप्पणी पाठवण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  याबाबत लवकरच अहवाल जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागात पदोन्नतीवर नव्याने आलेले अनेक लिपिक कार्यरत आहेत. या लिपिकांनी माध्यमिकला काम करण्यास पसंती दर्शवली आहे. त्यामुळे चांगले काम करण्याच्या अटीवर या कर्मचाऱ्यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे. माध्यमिकचा कारभार पारदर्शक करण्यासाठी सीईओ जंगम पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताटे यांनी सोडले कार्यालय

वेतन पथक कार्यालयाकडे असलेले वरिष्ठ लिपिक ताटे हेही माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजात मदत करत होते. पण माध्यमात त्यांच्याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून माध्यमिकच्या कार्यालयात कामकाजाच्या मदतीसाठी येणे बंद केले आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी मंगळवारी त्यांना कामकाजास मदत करण्यास बोलावले तरीही ते आले नाहीत. प्रामाणिकपणे काम करत असतानाही असा विनाकारण आरोप झाल्याने व्यथीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण ज्यांच्याविषयी तक्रारी आहेत त्यांनी मात्र असा प्रामाणिकपणा दाखविल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सीईओचा पुढचा ॲक्शन प्लॅन काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button