सोलापूरमहापालिकाशिक्षण

सोलापुरात आली दोन ट्रक पुस्तके

यंदा पुस्तकातच केली गृहपाठाची सोय

सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या आणि सर्व माध्यमाच्या खाजगी शाळाची शैक्षणिक वर्षाची सुरुवात शनिवार दि.१५ जूनपासून होणार असून. शाळेच्या पहिल्याच दिवशी सहा माध्यमाच्या ३२७ पात्र शाळेतील ७० हजार १८२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून एक जून नंतर सर्व शाळांना वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तके दिली जातील अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी दिली आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके बालभारती पुणे येथून दोन ट्रक पाठ्यपुस्तके सोलापूर शहर साधन केंद्र ०१, मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा क्रमांक ६ येथे आली असून बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे मराठी विभागाचे माजी सदस्य पद्माकर कुलकर्णी, पर्यवेक्षक संतोष बुलबुले, भगवान मुंडे, समग्र शिक्षाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रियाज अत्तार, यांच्या प्रमुख उपस्थितीत उतरून घेण्यात आली. याप्रसंगी प्रशांत साठे विषय साधन व्यक्ती, अमोल धस विशेष शिक्षक, प्रसन्न देवनूर, श्रीशैल भागानवर, राजू नाईकवाडी आदी कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर शहरातील मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि उर्दू या सर्व माध्यमाचे मिळून ३२७ शाळा मधील पहिली ते आठवीच्या ७० हजार १८२ विद्यार्थ्यांना २ लाख ९२ हजार ९०२ पाठ्यपुस्तकांचे वाटप त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या आणि मान्यवर पालकांच्या हस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप केले जाणार आहे. त्या दिवशी मुलांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. शाळांची स्वच्छता करणे, वर्गाची सजावट करणे, तसेच मुलांचे स्वागत वाजत गाजत करणे, यासह गुलाब पुष्प देऊन विविध रंगांचे फुगे उडवून आणि मिठाई देवून करण्यात येणार आहे याची तयारी करण्यासाठी शिक्षकांना दोन दिवस आधीच म्हणजेच गुरुवार दिनांक १३ जून पासून शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी केल्या आहेत.

पुस्तकाला कोरी पाने…

यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात सर्वच विषयांचे धडे असणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या या पुस्तकात एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. राज्य सरकारने ८ मार्च २०२३ साली राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. यात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकाचे ओझ कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना ही एकात्मिक करण्यात आली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नियमानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आले आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना ही चारही पुस्तके प्रत्येक तिमाहीसाठी वापरता येणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या नव्या रचनेनुसार तीन-चार विषयांची पुस्तके चार भागांत एकत्रित केली आहेत. या पुस्तकाच्या बरोबर मुलांना वर्गामध्ये वह्या आणाव्या लागणार आहेत. मुलांना गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी वह्या घेऊन जाव्या लागणार आहेत, असेही महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button