सोलापूर : जिल्हा परिषदेत एकाच दिवशी शिक्षकांच्या बाबतीत दोन विरोधाभास पाहायला मिळाले. माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप हे अतिरिक्त शिक्षकांसाठी चक्क एका शाळेवर हजर झाले तर समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहातील शिक्षिकेबाबत समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी संस्थाचालकाची बाजू घेतल्यामुळे शिक्षकेला रडू कोसळले आहे. जिल्हा परिषदेत एकाच दिवशी विरोधाभास दर्शवणाऱ्या या दोन घटना घडल्यामुळे शिक्षकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे सध्या आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न संपविण्यासाठी ते स्वतः शाळांवर हजर राहुन नियुक्त्या देताना दिसून येत आहेत. शुक्रवार दिनांक दोन मे रोजी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सरस्वती चौकातील सेवासदन प्रशालेला भेट दिली. यावेळी सु.रा. मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका हजर नव्हत्या. उपस्थित शिक्षकांकडून त्यांनी मस्टर घेतले आणि माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त झालेले शिक्षक वसंत पवार यांना त्यांनी त्या शाळेवर हजर केले. मस्टरमध्ये त्यांचे नाव नोंदवून शेरा मारला. पवार यांचे नाव देयकात ॲड करून त्यांना त्यांच्या विषयाचा कार्यभार द्यावा व याचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाला सादर करावा असे त्यांनी शेऱ्यामध्ये सुचित केले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्यास संस्था तयार नाहीत अशा परिस्थितीत मी माझा अधिकार वापरत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावत आहे असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. येत्या काही दिवसात आणखी मोठ्या संस्थेमध्ये इतर शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे अतिरेक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात याविरुद्ध घटना घडली आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वस्तीगृहातील एका शिक्षकाचा प्रश्न समाज कल्याण विभागापर्यंत आला आहे. संस्थाचालकाने या शिक्षिकेला काढून टाकले आहे. याबाबत त्या शिक्षिकेने दाद मागितल्यावर समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी सुनावणी घेतली आहे. यावेळी समाजकल्याण अधिकारी सोनवणे यांनी संस्थाचालकांना अधिकार आहेत असा अभिप्राय दिल्याने त्या शिक्षिकेला रडू कोसळले. त्या शिक्षिकेने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेत आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी संस्थाचालकाच्या विरोधात भांडत आहेत तर समाजकल्याण अधिकारी संस्थाचालकाच्या बाजूने बोलत आहेत, अशा या विरोधाभासाची जिल्हा परिषदेत चर्चा रंगली आहे.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की