सोलापूरशिक्षण

दहावीच्या परीक्षेला गलेलठ्ठ विद्यार्थी; नंदेश्वरला पकडले 10 बोगस परीक्षार्थी

सोलापूर : दहावीच्या पहिल्याच पेपरला सोलापुरात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे दहा बोगस परीक्षार्थींना पकडण्यात आले आहे. सोलापुरात पित्याचे निधन झाल्यानंतर पित्याचे स्वप्न पुरे करण्यासाठी लाडक्या लेकीने दुःख गिळून दहावीचा पेपर दिला आहे.

20 फेब्रुवारी रोजी दहावीच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली. मराठी विषयाच्या पेपरला तयारीने जाणाऱ्या परीक्षार्थींचे प्रत्येक परीक्षा केंद्रावर स्वागत करण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षकांना परीक्षा कक्षातील काही विद्यार्थी एकदमच मोठे  असल्याचे दिसून आले. उत्तर पत्रिका देताना संशय आल्यावर संबंधित पर्यवेक्षकांनी त्या परीक्षार्थींकडे रिसीटची मागणी केली. त्या विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र नव्हते. त्यामुळे संबंधित पर्यवेक्षकांनी त्यांच्या रिसीटची ऑनलाईन खातरजमा केली. त्यावेळी संबंधित नंबरवर तोतया विद्यार्थी बसल्याचे दिसून आले. असे दहा परीक्षार्थी शोधून त्यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

पित्याचे प्रेत घरात; दिला दहावीचा पेपर

सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेमध्ये धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. धनश्रीने चांगला अभ्यास केलेला परंतु तिचे वडील भिकाजी पवार यांचे सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरातील सर्व सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यविधीसाठी नातेवाईक, शेजारी जमा होत होते. धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न वाया जाणार म्हणून शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक अस्वस्थ होते. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन नातेवाईक व धनश्रीच्या आईला, भावाला समजावून सांगून दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला सांगितले. धनश्रीला धीर दिला आणि तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसविले. पूर्ण तीन तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते, म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कॉल करून सांगितले. शिक्षणाधिकारी जगताप यांना ही माहिती मिळत असते तात्काळ परीक्षा केंद्रावर दाखल झाले. त्यांनी धनश्रीला धीर दिला. केंद्रप्रमुख गीता सादुल यांना तिला अर्ध्यातून पेपर सोडण्याविषयी सांगितले. दीड तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर अंत्यविधीला नेले. धनश्रीच्या या धैर्यामुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांचेच डोळे पाणावले.

धनश्री भिकाजी पवार ही दहावी इयत्तेत शिकत आहे. तिचा आज शुक्रवारी पुणे बोर्डाचा मराठीचा पहिला पेपर सकाळी दहा वाजता सोलापूरातील भू. म. पुल्ली कन्या प्रशाला केंद्रावर होता. ती परीक्षेला निघण्याच्या तयारीत असताना रुग्णालयात डायलिसेस उपचार घेत असलेले तिचे वडील भिकाजी पवार यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या विषण्ण मनस्थितीत ती परीक्षा देणार नव्हती. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी तिचे सांत्वन करीत पालकांशी संवाद साधला. परीक्षा देण्यास तिला प्रवृत्त केले. ती तयार झाली आणि पहिला मराठीचा पेपर दिला. पेपर संपल्यानंतर ती घरी आली. वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी झालेली होती. सर्वजण धनश्री येण्याची वाट पाहत होते. तिरडी बांधलेली होती. ती घरी येताच बापाच्या देहावर पडून पप्पा मी तुमचे स्वप्न पूर्ण करून दाखवते, असे म्हणत ती धाय मोकलून  रडू लागली. तिची अवस्था पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button