सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना झाले आहे. तत्कालीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली असून चौकशी समितीसमोर त्यांची सुनावणी घेतली जात आहे.
समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक विभागाची चौकशी समिती बुधवारपासून सोलापूर जिल्हा परिषदेत ठाण मांडून आहे. प्रभारी समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्या उपस्थितीत मागील काळात झालेल्या दिव्यांग विभागातील कामाची चौकशी करण्यात येत आहे. बार्शीतील तक्रारदारांनी याबाबत दिव्यांग आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दिव्यांग आयुक्तांनी हे प्रकरण प्रादेशिक समाजकल्याण विभागाकडे पाठविले आहे. या विभागाची समिती बुधवारपासून सोलापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात दिव्यांग कल्याण विभागाची चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले. तक्रारीच्या सुनावणीसाठी तत्कालीन समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांनाही समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे कवले हे बुधवारी या समितीसमोर हजर झाले होते. दिवसभर समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात या तक्रारीची सुनावणी सुरू असल्याने जिल्हा परिषदेत हा विषय चर्चेचा झाला आहे. हे पथक अद्याप ठाण मांडून असून गुरुवारीही चौकशी सुरूच असल्याचे सांगण्यात आले. समाजकल्याण विभागातील दिव्यांग विभागाचा कारभार ठप्प पडल्याने अनेकांची ससेहोलपट होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

More Stories
ग्रामीण भागातील गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा
मंगळवेढा न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात सुनावली आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार