सोलापूर : बांधकाम विभाग म्हटले की सर्वात दुर्लक्षित घटक. या विभागाने काम केल्याचे कुणाला दिसत नाही. पण सर्व विभागात हा बाप डिपार्टमेंट आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या आग्रहामुळे एका रात्रीत उभारला जर्मन हँगर, वारीचा मार्ग सुकर होण्यासाठी दहा दिवसात नॉन प्लॅन रस्ते प्लॅनमध्ये आणून सुधारणा केली. हे यंदाच्या वारीमधील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे हे एक मोठे यश म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हा परिषदेने आपल्यावर असलेले जबाबदारी सुखरूपपणे पार पाडून आषाढी वारी यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे शेखर गोतसुर्वे यांनी बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचा सन्मान केला. यावेळी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी वारीचे अनुभव कथन केले. यंदाची वारी वेगळ्या कामामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. महाराष्ट्र शासनाने पालखी सोहळ्या बरोबर चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकऱ्यांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर यंदा प्रथमच जर्मन हँगरचा वापर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पालखी मार्गावर जर्मन हँगर व वॉटरप्रूफ मंडपची सोय करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. पालखी मार्गावर जर्मन हँगर इतके लोकप्रिय झाले की वारकऱ्यांना बसायला जागा मिळत नव्हती. सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्यामुळे वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. माणसाला घर असेल तरच तेथे सर्व सुविधा उपलब्ध करता येतात. वारकऱ्यांना मूलभूत गरजा पुरवण्याचे काम बांधकाम विभागाकडे होते. चालून थकलेल्याना निवारा व मुक्कामाच्यादृष्टीने घरासारखी सोय असलेले जर्मन हँगर वारकऱ्यांना खूप सोयीचे ठरले.
काय आहे जर्मन हँगर…
कमी वेळात झटकन मोठा निवारा उभारण्याचे सोय जर्मन पद्धतीच्या हँगरमध्ये करण्यात आली आहे. यासाठी अल्युमिनियमचे अँगल वापरले जातात. वजनाने हलके असल्याने वाहतूक व उभारणीला चांगला फायदा होतो. फिटिंगची चांगली व्यवस्था असल्याने उभारणीचे काम वेगाने होते. छतासाठी वॉटरप्रूफ ताडपत्री वापरली जाते. उभारण्यात आलेल्या छतामध्ये कप्पे करून वेगवेगळे कक्ष उभारता येतात. याशिवाय जर्मन हँगरमध्ये स्क्रीन वापरून वारकऱ्यांना भक्ती गीतांचा आस्वाद घेता आला. पालखी सोहळा प्रमुखांनी जर्मन हँगरला पसंती दर्शवली. त्यामुळे पुढीलवर्षी पालखी तळाच्या मुक्कामाच्या ठिकाणीच जर्मन हँगर उभारण्याचे नियोजन आहे. पालखी प्रमुखाच्या आग्रहामुळे वाखरी पालखी स्थळावर एका रात्रीत जर्मन हँगर उभा करावा लागला. यासाठी स्थानिक सरपंचाच्या मदतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी खूप परिश्रम घेतल्याचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी नमूद केले.
65 किलोमीटरचे रस्ते
पालखी मार्गाला लागून समांतर असलेल्या नॉन प्लॅनमधील सोळा रस्त्यांचा यंदा प्रथमच वाहतुकीसाठी वापर करण्यात आला. हे रस्ते कोणत्याच प्लॅनमध्ये नसल्यामुळे त्यांना निधी मिळणार नव्हता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारामुळे तीन कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आल्याने दहा दिवसात या रस्त्यांचा प्लॅन करण्यात आला. त्यानंतर पुढील दहा दिवसात टेंडर काढून कामेही सुरू करण्यात आली. यातून पंधरा रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले. पावसाळी वातावरणामुळे तुळशीच्या एका रस्त्याचे डांबरीकरण करता आले नाही. या रस्त्यावरून जाणाऱ्या पालखी मार्गांचाही मार्ग खडतर होता. पण हे रस्ते झाल्यामुळे अनेकांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले आहेत. टीमवर्कमुळे यंदा वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देता आल्या याचे समाधान आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ