सोलापूरजिल्हा परिषद

व्हाट्सअपवर सीईओ जंगम यांच्या नावे “हॅलो प्रसाद’असा मेसेज आला अन् ते सावध झाले

सोलापूर : व्हाट्सअपवर “हॅलो प्रसाद.. हाऊ आर डुइंग’, असा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या व्हाट्सअपवरून मेसेज आला. अन्  महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सावध झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे हॅकर्सचा फसवणुकीचा प्रयत्न हाणून पाडला गेला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नावे हॅकर्सने फेक व्हाट्सअप अकाउंट काढल्याचे बुधवारी निष्पन्न झाले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांना सीईओ कुलदीप जंगम यांचा फोटो असलेल्या व्हाट्सअपवरून बारा वाजून तीन मिनिटांनी मेसेज आला. हॅलो प्रसाद… व्हाट्सअप वरील मेसेज पाहून मिरकले दचकले व साहेबांचा मेसेज कसा आला म्हणून उत्तर देण्यासाठी त्यांनी मोबाईल हातात घेतला. तोच समोरच्याने चॅटिंग सुरू केले, “हाऊ यू आर डुइंग…’ या सवालामुळे मिरकले यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी व्हाट्सअपचा नंबर चेक केला. नंबर वरून खात्री झाली की हॅकर्सने हे फेक अकाउंट तयार केले आहे. समोरच्या चॅटिंगला त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी थेट सीईओ जंगम यांना संपर्क करून याची माहिती दिली. सीईओ जंगम हे सावध झाले व त्यांनी या अकाउंटबाबत पोलिसांना माहिती दिली तसेच जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अधिकाऱ्यांनाही सावध केले.

हॅकर्सने संबंधित फेक अकाउंटवरून पहिले दोन दिलेल्या मेसेजला महिला व बालकल्याण अधिकारी मिरकले यांनी उत्तर नाही दिल्यावर पुन्हा हॅकर्सने चॅटिंग केले. दिस इज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मिस्टर कुलदीप जंगम, व्हेअर आर यु ऍट दि मुव्हमेंट, या चॅटिंगलाही मिरकले यांनी काहीही उत्तर दिले नाही. सीईओ कुलदीप जंगम यांना त्यांनी या फेक अकाउंटबाबत सावध केल्याने हॅकर्सचा डाव उधळला गेला. इतर कोणा अधिकाऱ्यांना असा मेसेज गेला असता तर वरिष्ठच आपल्याशी मोबाईल वरून चॅटिंग करत आहेत असा समज करून घेऊन त्यांच्या आदेशाचे पालन झाले असते तर मोठी फसवणूक झाली असती अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. महिला बालकल्याण अधिकारी मिरकले व सीईओ जंगम यांच्या सतर्कतेमुळे सोलापुरात हॅकर्सचा एक मोठा डाव हाणून पाडला गेला आहे.

काही महिन्यापूर्वी अप्पर पोलीस महासंचालक विश्वासराव नांगरे– पाटील यांच्या नावाने हॅकर्सनी अशी फसवणूक केली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्यांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर मोबाईल नंबर व इतर माहिती हॅक होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्यांनी आलेल्या मेसेजची खात्री करणे आवश्यक आहे. असे वाढते गुन्हे लक्षात घेऊन सोलापूर शहर क्राईमने अशा फसवणुकीच्या प्रकाराबाबत जनजागृती सुरू केली प्रकाराबाबत जनजागृती सुरू केली आहे विविध शासकीय कार्यालय व शाळांमध्ये जाऊन याबाबत माहिती दिली जात आहे. यामुळे अशी सजगता येत आहे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. हॅकर्स तुमचे सोशल मीडियावरील फोटो व मैत्रीसंबंधी माहिती हॅक करून अशाप्रकारे फसवणूक करतात त्यामुळे सर्वांनी सावध राहावे.

अविनाश पाटील, सायबर तज्ञ

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button