March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

तुम्हाला मिरची कांडप, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, सायकल अर्ध्या किमतीत पाहिजे? मग करा क्यूआर कोड स्कॅन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जिल्हा परिषदेने एक मोठी योजना आणली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडील सेस फंडातून राबविल्या जाणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी यापुढील काळात ऑफलाइनऐवजी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासाठी क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात येत असून यातून थेट मोबाईल ॲप मधून तुम्हाला अर्ज करून पिठाची गिरणी मिरची कांडप व सायकल निम्म्या किमतीत घेता येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बालकल्यांची योजना ऑनलाइन करण्यात येत आहे. यासाठी क्यूआर कोड विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला जायची आता तुम्हाला गरज भासणार नाही. क्यू आर कोड वर स्कॅन केल्यावर हे ॲप तुमच्या मोबाईलवर आपोआप ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला कोणता लाभ पाहिजे त्याबाबतचा अर्ज ऑनलाइन भरता येईल. या ॲपवर तुम्हाला थेट आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, कोटेशन अपलोड करून या साहित्याची मागणी करता येणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेत तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर थेट मेसेज येणार आहे. पुन्हा तो मेसेज ओपन करून केलेले साहित्य खरेदीची पावती व त्यासोबत चा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला देय असलेले 50 टक्के अनुदान थेट खात्यावर जमा होणार आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ॲपचा शुभारंभ होईल. त्यावरून महिला बालकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यात महिलांसाठी पिठाची गिरणी, मिरची कांडप मशिन, शिलाई मशिन तसेच शालेय मुलींसाठी सायकल वाटप आदी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरीता आतापर्यंत ऑफलाइन पध्दत होती. यासाठी दरवर्षी तेच ते लाभार्थी अर्ज करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याचा लाभ सर्वांना मिळावा व योजनेत पारदर्शकता राहावी या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषदेत पहिल्यांदाच ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन लाभार्थी निर्माण होणार

आतापर्यंत गावातील प्रमुखाच्या वशिल्याने तेच ते अर्ज येत होते. मोबाईल ॲप द्वारे आता प्रत्येक गावकऱ्यांच्या हातात हा अर्ज जाणार आहे. त्यातून ही निवड होणार आहे. ऑनलाइन पध्दतीमुळे दुबार अर्ज टळणार आहेत. यापूर्वी लाभ घेतलेल्यांची नावेही समजणार असल्याने योजनेत पारदर्शकता राहणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येणार असून क्यूआर कोडही देण्यात येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऑनलाइन अर्ज उघडला जाणार आहे. या अर्जात आवश्यक असलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तो अर्ज गटविकास अधिकार्‍यांकडे जाणार आहे. तेथून छाननी झाल्यानंतर मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज जाईल. त्यानंतर अर्ज मंजूर झाला की साहित्य घेतल्याचे बील, फोटो आणि त्याचे जिओ टॅगिंग केल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे मिरकले यांनी सांगितले.