सोलापूर : नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर सोलापुरात कित्येक वर्षानंतर यंदा डॉल्बी मुक्त वातावरणात पारंपारिक वाद्याच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.
सोलापुरात यंदा प्रथमच डॉल्बीमुक्त वातावरणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच नागरिकांनी डॉल्बीला विरोध केला. यामुळे पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात डॉल्बीला बंदी घातली. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकात पारंपारिक वाद्याला पसंती दिसून आली. हलगी, ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या. लेझीम टिपऱ्या, झांज या मर्दानी खेळांचा जोश मिरवणुकीमध्ये दिसून आला. या मिरवणुकीत डॉल्बी हद्दपार झाल्यामुळे गोंगाट कमी दिसून आला. यामुळे गणेश विसर्जनांच्या मिरवणुका व टिपऱ्या, झांज, लेझीमचे पैत्रे पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसून आली. विजापूर रोड, लष्कर, पूर्वभाग, बिडी घरकुल, सार्वजनिक मध्यवर्ती गणेश मंडळातर्फे शहरातील प्रमुख मार्गांवर भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच मिरवणुकावेळी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. मानाच्या आजोबा गणपतीचे रविवारी सकाळी गणपती घाट येथे विसर्जन करण्यात आले. शहरातील मान्यवर मंडळाच्या गणपती मिरवणुकीसमोर लेझीमचे भव्य पथक लक्ष वेधून घेत होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीमचे अनेक खेळ सादर करत भक्तांना आकर्षित केले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही अशाच पद्धतीने डॉल्बीमुक्त वातावरणात मिरवणूक पार पडल्या आहेत.
पुढच्या मिरवणुकाही अशाच व्हाव्यात
यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीपासूनच डॉल्बी मुक्तीचा नारा दिला गेला. त्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत व उत्साही वातावरणात पार पडल्या आहेत. आता सोलापुरात यापुढील कोणत्याही मिरवणुका अशाच पद्धतीने व्हाव्यात अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
पहा लेझीमचा बहारदार खेळ…

More Stories
रेड कार्पेट; सोलापूर झेडपी अध्यक्ष निवडीची जय्यत तयारी
सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार
अखेर.. सोलापूर झेडपीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरले