जिल्हा परिषदमहाराष्ट्रसोलापूर

राऊत यांची नंदुरबारला बदली; उप आयुक्तांची विनंती फेटाळली

सोलापूर : सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले परमेश्वर राऊत यांची नंदुरबारला बदली करण्यात आली आहे तर पुणे विभागीय उपयुक्त यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग भरती मध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती नेमण्याबाबत केलेली विनंती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी फेटाळली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत सन 2021 मध्ये झालेल्या कर्मचारी भरती घोटाळा गाजत आहे. यावेळी भरती करताना ग्रामपंचायत कोट्यातील 55 कर्मचारी अतिरिक्त भरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेने हे स्पष्टीकरण दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या सीईओनीच याबाबत आठवड्यात निर्णय घ्यावा असा निर्णय दिला आहे. यावर सीईओ कुलदीप जंगम यांनी आपला निर्णय संघटनेला कळविलेला आहे. असे असतानाही संघटनेने न्याय मिळावा, अशी भावनिक साद घालत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 16 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण केले. विभागीय आयुक्त कार्यालयाने या एका दिवसाच्या उपोषणाची तात्काळ दखल घेतली. आस्थापना विभागाचे उप आयुक्त नितीन माने यांनी यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नावे तात्काळ पत्र जारी केले. या भरतीबाबत जिल्हा परिषद प्रशासन सन 2019 च्या कर्मचारी भरतीबाबत 55 पदे अतिरिक्त झाली आहेत, अशी खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत आहे. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून व संघटनेला वेळ देऊन त्यांचे म्हणणे विचारतात घेऊन पंधरा दिवसात चौकशी करावी व आवश्यकता वाटल्यास शासनाचे मार्गदर्शन घ्यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल युनियनला द्यावा असे सुचित केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेला हे पत्र देताना उप आयुक्त नितीन माने यांनी या प्रकरणाची जुजबी माहिती घेत केवळ संघटनेला मदत करण्याच्या उद्देशाने कार्यवाही केल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 2021 च्या कर्मचारी भरतीत अनियमित झाल्याचा शासनाला अहवाल दिला आहे. याबाबत शासनाकडून उच्चस्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. याबाबत संघटनेने त्यावेळीच विभागीय आयुक्तांकडे प्रश्न मांडण्याऐवजी न्यायालयात धाव घेतली. याबाबत न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपले लेखी स्पष्टीकरण संघटनेला दिलेले आहे. तसेच कर्मचारी भरतीत अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह चौघा जणांवर विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. असे असताना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या सीईओना पुन्हा चौकशी समिती स्थापन करण्याबाबत पत्र काढले आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मुख्य सचिवांना याबाबत अहवाल सादर झाला असल्यामुळे ही विनंती फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले.

राऊत यांची साताऱ्यावरून बदली…

ग्रामपंचायत भरती प्रकरणात अनियमितता केल्याप्रकरणी तत्कालीन प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेला नियुक्त झालेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेला नियुक्त झाल्यावर राऊत हजर झाले नाहीत. दरम्यान हे प्रकरण समोर आले. सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक राऊत सोलापूर जिल्हा परिषदेला इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते. पण या प्रकरणामुळे त्यांना नंदुरबारला जावे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button