February 1, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात मुलांसोबत सेल्फी काढून पोलीस पत्नीची आत्महत्या

सोलापूर: मुलांसोबत सेल्फी घेऊन पोलीस पत्नीने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अश्विनी सिलसिद्ध सलगर असे त्या पोलीस पत्नीचे नाव असून पती रात्री कामावर गेल्यावर तिने हे कृत्य केल्याचे दिसून आले.

सिलसिद्ध सलगर हे न्यू संतोष नगर पोलीस लाईन येथे रहावयास आहेत. ते ड्युटीवर गेल्यावर पत्नी अश्विनी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पती कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच म्हणजेच विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सिलसिद्ध यांची पोलीस ठाण्यात नाईट ड्युटी होती. त्यामुळे ते मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात गेले होते. घरामध्ये पत्नी अश्विनी व दोन मुले होती. मध्यरात्री अश्विनीने दोन्ही मुलं झोपलेली असताना त्यांच्यासोबत सेल्फी घेतला आणि जवळच राहत असलेल्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. नेहमीच अश्विनी अशी धमकी देत होती म्हणून नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

अश्विनीने टाकलेलेला मेसेज नातेवाईकांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पाहिला आणि तिच्या पतीला माहिती दिली. सिलसिद्ध यांनी अश्विनीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही. घराजवळ राहत असलेल्या नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. मात्र दरवाजा आतून बंद होता. काही वेळातच पोलीस पती सिलसिद्ध त्या ठिकाणी आले आणि दरवाजा तोडला. आतमध्ये पाहिले असता अश्विनीने साडीच्या साह्याने सिलिंगला गळफास घेतल्याचे दिसले.

पती आणि इतरांनी खाली उतरून तिला उपचारासाठी सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे घोषित केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.